किशोर साहू, मौदा, ता. १४ :- विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला वृद्धिंगत करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथील शिक्षक करत असतात. असाच एक सहशालेय उपक्रम अंतर्गत तोंडली शाळेने विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस सर्विस चे कामकाज व मुलाखत त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी पोस्ट ऑफिस इंदोरा येथे भेट दिली.
क्षेत्र भेटीची सुरुवात इंदोरा ग्रामपंचायतीपासून झाली. ग्रामपंचायत इंदोरा येथील सरपंच नेकसिंग गहेरवार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीचा कार्यकाल, निर्णय प्रक्रिया, निधी नियोजन, गाव विकास योजना आणि प्रशासनाची रचना याबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम नकोरिया आणि चयानलाल नेवारे उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसची क्षेत्र भेट घेतली. पोस्ट मास्टर मदनसिंग गहेरवार यांनी टपाल सेवांची ओळख करून दिली.
पोस्टमन बाबूसिंग नकोरिया यांनी विद्यार्थ्यांना टपालाच्या विविध योजना, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, टपाल वितरण प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोस्टमास्टर व पोस्टमन यांची मुलाखत घेतली विविध प्रश्न विचारून पोस्टासंबंधीच्या सर्व कामकाज व योजना समजावून घेतल्या विद्यार्थ्यांच्या कुतूहल पूर्वक प्रश्नांचे कौतुक केले.
या क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळा इंदोरा येथेही भेट देऊन तेथे राबविलेले नवीन शैक्षणिक उपक्रम, नवकल्पना व शिक्षण-साहित्य प्रत्यक्ष पाहिले. इतर शाळेतील उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिकण्याची प्रेरणा अधिक वाढली.
या संपूर्ण ज्ञानवर्धक क्षेत्र भेटीचे आयोजन मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे आणि सहशिक्षक निलेश जाधव यांनी मौदा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे तसेच धानोली केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षण देण्यात तोंडली शाळा सातत्याने अग्रगण्य ठरत असल्याचेही उपस्थितांनी कौतुक केले.








