spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये विजय दिवस उत्साहात

नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये १६ डिसेंबर रोजी ‘विजय दिवस’ अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. १९७१ साली भारत- पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सी.पी अँड बेरार शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल विकास चंद्र शर्मा, कमांडिंग ऑफिसर, २० महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी., नागपूर तसेच डॉ. लेफ्टनंट कर्नल अजित पी. भास्करवार, शिक्षक आघाडीचे आणि सी.पी अँड बेरार रवीनगरचे अनिल शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने करण्यात आली. त्यानंतर अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे सन्मानचिन्ह व रोप देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी, समूहगीत व सादरीकरणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाने भारावून टाकला. या सादरीकरणांतून भारतीय सैन्याचे शौर्य, पराक्रम, त्याग व बलिदान प्रभावीपणे मांडण्यात आले. विजय दिवसाचे महत्त्व विशद करताना प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना शौर्य, शिस्त, देशसेवा व राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे स्मरण सदैव ठेवून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी कर्नल विकास चंद्र शर्मा यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी. (राष्ट्रीय छात्रसेना) विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास तसेच देशसेवेची भावनाकशी विकसित होते, याची माहिती त्यांनी दिली. एनसीसीच्या माध्यमातून सैन्य, संरक्षण सेवा व विविध क्षेत्रांत उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध होतात, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व सैन्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन शाळेच्या शिक्षिका विशालक्षी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आली. एकूणच विजय दिवसाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची, त्यागाची व बलिदानाची जाणीव होऊन राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Popular Articles