– लोणारा येथे रामधून काढून ग्रामस्वच्छता; वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश
नागपूर :- गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शननगर, नागपूर यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि ग्रामविकासाचा संकल्प घेऊन राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत रविवार, १८ ऑक्टोबर रोजी कामठी तालुक्यातील लोणारा गावात रामधून काढून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत लोणारा हे नागपूर जिल्ह्यातील ७० वे गाव ठरले आहे. गावाच्या स्वच्छतेसोबतच सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा मंडळाचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला. गुरुदेव सेवा मंडळ, पेन्शननगर, नागपूर यांच्या वतीने दर महिन्यातील एक रविवार ग्रामस्वच्छता आणि सामाजिक प्रबोधनासाठी राखून ठेवण्यात येतो. या दिवशी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य संबंधित गावात जाऊन ग्रामस्वच्छता करतात. त्याचबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजविणे, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धना बाबत जागृती करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती करणे, अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सातत्यपूर्ण कार्यामुळे आतापर्यंत मंडळाने नागपूर जिल्ह्यातील ७० गावांमध्ये पोहोचून सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले आहेत. रविवारी लोणारा येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात रामधुनीने करण्यात आली.

रामधुनीच्या माध्यमातून गावात जनजागृती करीत परिसरातील स्वच्छता करण्यात आली. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छतेबरोबरच सामाजिक एकोपा, पर्यावरणाचे रक्षण आणि व्यसनमुक्त जीवनशैली आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकास, श्रमदान, स्वच्छता, सामाजिक समता आणि सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मितीचा संदेश दिला. त्यांच्या याच विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मंडळाच्या वतीने गावांमध्ये ग्रामगीता आणि सामुदायिक प्रार्थनेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात येते. लोणारा येथेही या पुस्तकांचे वाटप करून गावात दर गुरुवारी सामुदायिक प्रार्थना घेण्याचे ठरविण्यात आले. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढीस लागावा, हा यामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. रामदास टेकाडे, सचिव रमेश सोनकुसरे, सहसचिव सतीश राईकवार, कोषाध्यक्ष मधुकर धोटे, सहकोषाध्यक्ष दामोदर मामूलकर, रामराव डांगोरे, यशवंत निकडे, अरुण राऊत, गुंडेराव ठाकरे, मनोहर हेडाऊ, नामदेव बालपांडे, राजीव देवगडे, मदन मुदगल, विजय गिरी, निळकंठ बारब्दे आणि सुरेश पराते, वसंतराव फरतोडे यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. तसेच लोणारा गावचे सरपंच पेठे आणि गावातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी प्रा.रामदास टेकाडे, गुंडेराव ठाकरे आणि यशवंत निकडे यांनी आपल्या मनोगतातून ग्रामस्वच्छता, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ रुजविण्या सोबतच नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरण जनजागृती हे उपक्रम केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता लोकचळवळीचे स्वरूप धारण करणे आवश्यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच पेठे यांनी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांचे आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळाच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे ग्राम स्वच्छतेसोबतच सामाजिक जागृती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार ग्रामीण भागात होत असून, ७० गावांपर्यंत पोहोचलेले हे अभियान समाजसेवेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.








