कामठी :- येरखेडा नगरपंचायतच्या पहिल्यावहिल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजकिरण बर्वे यांनी काँग्रेसचे सुमेध मधुकर रंगारी यांचा चुरशीच्या लढतीत १२५० मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह बर्वे यांना येरखेडा नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान लाभला आहे.
सकाळी सुमारे दहा वाजता नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शिकतोळे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष लांडगे यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सहा फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत चढ-उतार पाहायला मिळाले, मात्र अखेरीस भाजपचे उमेदवार राजकिरण बर्वे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय सुनिश्चित केला.
पहिल्या फेरीत बर्वे यांना १६४० तर रंगारी यांना ७५८ मते मिळाली असून बर्वे यांना ८८२ मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत काँग्रेसने आघाडी कमी केली, मात्र तिसऱ्या व पाचव्या फेरीत भाजपने पुन्हा मजबूत आघाडी घेतली. अखेरीस सहाव्या फेरीअखेर बर्वे यांनी १२५० मतांची आघाडी राखत विजय संपादन केला.
अंतिम निकालानुसार भाजपचे राजकिरण बर्वे यांना ६०४८ मते, काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुमेध मधुकर रंगारी यांना ४७९८ मते मिळाली. समाजवादी पार्टीचे महेंद्र चंद्रभान बारमाते यांना १६८ मते, अपक्ष सुरेश भीमदेव थूल यांना १५९, अपक्ष सुमेध वासुदेव दुपारे यांना १२९, ऋषभ राजू भवते यांना १११ मते मिळाली, तर १३५ नोटा मते नोंदविण्यात आली. एकूण ११,५४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नगरपंचायतमधील १७ नगरसेवकांपैकी भाजपचे १० नगरसेवक, काँग्रेसचे ६ नगरसेवक, तर भाजप बंडखोर एक अपक्ष नगरसेवक विजयी झाला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, जिल्हा महामंत्री अनिल निदान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, माजी सभापती उमेश रडके, रनाळ्याचे सरपंच पंकज साबळे, येरखेडा भाजप अध्यक्ष राकेश काळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचार सभा व पदयात्रा घेतल्या होत्या.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांनी सांगितले की, “पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक सभेत येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा मांडत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच भाजपला हा मोठा विजय मिळाला असून, येरखेडाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.”
येरखेडा नगरपंचायत निवडणुकीत नातेसंबंधांची लढत ठरली चर्चेचा विषय: वहिनीने दिराचा, तर काकाने पुतण्याचा केला पराभव
येरखेडा नगरपंचायत निवडणुकीत काही प्रभागांमध्ये नातेसंबंधांतील उमेदवार आमनेसामने आल्याने मतदारांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये पार पडलेल्या चुरशीच्या लढतींनी निवडणूक निकालाला वेगळेच रंग दिले.
प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मंदा प्रमोद महाले यांनी आपलेच दीर असलेल्या काँग्रेसचे उमेदवार दिनेश वसंतराव महाले यांचा अवघ्या २९ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. मंदा महाले यांना १४१ मते मिळाली, तर दिनेश महाले यांना ११२ मते मिळाली. नातेसंबंधांतील ही थेट लढत अखेर वहिनीच्या बाजूने झुकली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक दहा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून येथेही काका-पुतण्या यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीचे सुशांत बंडू सलाम यांनी ३३७ मते मिळवली, तर त्यांचे पुतणे अतुल शंकर सलाम यांना २०६ मते प्राप्त झाली. अखेर काका सुशांत सलाम यांनी पुतणे अतुल सलाम यांचा ६१ मतांनी पराभव करत विजय संपादन केला.
या दोन्ही प्रभागांतील निकालांनी येरखेडा नगरपंचायत निवडणुकीतील रंगत वाढवली असून, कौटुंबिक नात्यांपेक्षा राजकीय समीकरणे आणि मतदारांचा कौल निर्णायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.








