पांढरकवडा :- शहरातील सावरकर वॉर्ड येथील रहिवासी आकांक्षा किसनराव म्यानेवार (वय २३) हिचे गुरुवार, दि.२५ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सावरकर वॉर्डसह शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा ही बल्लारशा येथील सैनिक शाळेत शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती आपल्या मूळ गावी पांढरकवडा येथे आली होती. दरम्यान अचानक तिची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही तिची तब्येत गंभीर होत गेल्याने पुढील उपचारांसाठी नागपूर येथे नेण्यात आले. नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी तिला डबल निमोनियाचे निदान झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र गुरुवार सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तरुण वयात गंभीर आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील मोक्षधाम स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीस नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकांक्षा हिचे वडील किसनराव म्यानेवार हे शेती व्यवसाय करतात. तीन बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. अभ्यासू, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ती सर्वांची लाडकी होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व नागरिक शोकसागरात बुडाले असून अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनीही तिच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.








