spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सण की वेसण ?

नाताळच्या गळचेपीचा विषय पक्षीय राजकारणापुरता वापरणे योग्य नाहीच. त्यापेक्षा मोठा प्रश्न असा की संस्कृती म्हणजे काय याविषयीची समज आपल्याला कितपत उरली आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही केले तरी टीकाकार सज्जच असतात, हे अर्धसत्य. त्याच्या पुढला भाग असा की, प्रसंगी मोदी यांनी काहीच केले नाही तरीसुद्धा टीका होऊ शकते. त्याहीपुढले पूर्णसत्य असे की, राजकारणातील व्यक्ती कशात लक्ष घालताहेत आणि कशाकडे दुर्लक्ष करताहेत, यावर अनेकांची नजर असते. लोकशाही मूल्यांचा प्रसार जगभर झाल्यानंतर हे असे कोणत्याही देशात होणारच. या वास्तवाचा प्रत्यय यंदाच्या नाताळदिनी आला. मोदी दिल्लीतल्या एका चर्चमध्ये जाऊन नाताळच्या प्रात:प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्या चर्चचे प्रमुख पाद्री रेव्हरंड पॉल स्वरूप यांनी ‘विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी उदंड बळ देण्या’साठी जाहीरपणे प्रार्थना करूनच ‘आमेन’ म्हटले. यावर टीकाकारांचे म्हणणे असे की, ख्रिास्ती मतदारसंख्या अधिक असलेल्या केरळसारख्या राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळेच मोदींनी चर्चमध्ये जाण्याचे राजकारण केले. पण ही अशीच टीका दिवाळी साजरी करणाऱ्या पाश्चात्त्य राष्ट्रप्रमुख वा सरकारप्रमुखांवरही होऊ शकते. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीदेखील कोलकात्यातील चर्चमध्ये नाताळप्रार्थनेस उपस्थित राहिल्या, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली ती लांगूलचालनाची. तो शब्द मोदींबाबत कुणी वापरलेला नाही. पण मोदींवर दुर्लक्षाचा आरोपही नाताळदिनीच होणे हा केवळ टीकाकारांचा कोतेपणा की ते आपल्या राजकारणाचेच अवलक्षण याची चर्चा होणे आवश्यक.

याचे कारण दुर्लक्षाचा आरोप ज्या विषयाबद्दल झाला त्यातून उमगणारे आहे. हा विषय देशभरात ठिकठिकाणी नाताळ साजरा करू पाहणाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांचा. हे हल्ले फक्त केरळ, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि आसाम अशा आठच- म्हणजे एकचतुर्थांश राज्यांत झाले आणि त्यात कोणीच जीव गमावलेला नाही, उर्वरित भारतात नाताळ नेहमीसारखाच साजरा झाला- यावर समाधान मानता येत नाही; कारण अगदी थोड्या ठिकाणी नेमके हल्ले करणे हेच तर दहशतीचे तंत्र म्हणून यशस्वी होत असते. हल्ले कोणी केले, त्यांचा संबंध भाजपशी दूरान्वयाने तरी जोडता येतो की नाही, या साऱ्या नंतरच्या गोष्टी. टीकाकार फक्त पक्षीय विचार करत असतील, तर तो त्यांचा कोतेपणाच. ‘मोदी यावर गप्प कसे’ म्हणणाऱ्यांना दिल्लीच्या वेशीवरले शेतकरी आंदोलन, कोविडकाळात अनेक श्रमिकांना मूळ गावी जाण्यासाठी करावी लागलेली पायपीट असे कोणतेही निमित्त पुरेसे ठरते. पण नाताळची गाणी- कॅरोल- गाणाऱ्यांवरचा केरळमधला हल्ला, राजस्थानात विद्यार्थ्यांना नाताळ साजरा करण्याची सक्ती केल्याचा आरोप शिक्षकांवर करून तेथे घातला गेलेला गोंधळ, आसाम आणि छत्तीसगड येथे नाताळच्या सजावटीची नासधूस, मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात अंध महिला चर्चमधून परत येत असताना तिच्याशी केले गेलेले अपमानास्पद वर्तन आणि झाबुआ जिल्ह्यातील चर्चेसना निव्वळ कॅरोल गाऊन नाताळ साजरा करण्यासाठी परवानगी नाकारल्याने कोर्टबाजी करावी लागणे, उत्तर प्रदेशात नाताळची सुटी राज्य सरकारने बंद करणे आणि त्या राज्यातील गाझियाबादमध्ये चर्चमध्ये गेलेल्या दाम्पत्याला भर चौकात दमदाटी, ओडिशातील भुवनेश्वरच्या रस्त्यावरील कुणा विक्रेत्याला सान्ताक्लॉजच्या टोप्यांची विक्री बंद करायला लावणे… यापैकी काही प्रकारांशी भाजपचे गल्लीपुरते नेते, काहींशी बजरंग दलासारख्या संघटना तर काहींशी खुद्द प्रशासकीय यंत्रणांचा संबंध असला तरीही नाताळच्या गळचेपीचा विषय केवळ पक्षीय राजकारणापुरता वापरणे योग्य नाहीच.

ही गळचेपी एका सणाची आहे, सण साजरे करण्याच्या ऊर्मीचीही आहे. चर्चमध्ये गेले म्हणून काही कुणाचा धर्म बुडत नाही हा मूकसंदेश मोदींनी आज दिला, त्याआधी अनेक व्यक्तींनी अनेकदा तो दिला असूनही धर्मांतराविषयीच्या आरोपांवरून कायदा हातात घेण्यासाठी नेमका नाताळचा मुहूर्तच शोधून या सणावर काहीजण घाला घालत आहेत. यातून निर्माण होणारा प्रश्न निव्वळ कुणा पक्षाला, कुणा संघटनांना दूषणे देऊन संपणारा नाही. कारण एकतर असे बोल अनेकदा लावले गेले आहेत आणि दुसरे म्हणजे कदाचित त्यातूनच, आपला राजकीय अजेंडा यशस्वी होत असल्याची खात्री या संघटनांना पटते आहे. पण प्रश्न केवळ या संघटनांपुरता नसून तो संस्कृती म्हणजे काय याविषयीची समज आपल्याकडे उरली आहे की नाही, नसेल तर कधी येणार, हादेखील आहे.

‘आपले आपल्याकडेच ठेवणे ही प्रकृती, दुसऱ्याचेही ओरबाडून घेणे ही विकृती आणि आपले दुसऱ्याला वाटून देणे ही संस्कृती’ हे वाक्य संस्कृतीची व्याख्या म्हणून फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिके घेणारेच ऐकवतात असे नाही. संघाच्या वाऱ्यालाही उभे न राहिलेल्यांनासुद्धा संस्कृतीतले ‘दुसऱ्यां’ना स्थान असल्याची जाणीव असते. मुळात संस्कृती या शब्दातला ‘सं’ हा सगळे मिळून, एकत्रितपणे, पूर्णपणे अशाच अर्थाचा आहे – हा ‘सं’ उपसर्गच संवाद, संमती आदी शब्दांत आहे हा व्याकरणाचा भाग माहीत नसला तरी आनंद वाटून घ्यावा एवढे शहाणपण सर्वांकडे आपसूक असते. ती प्रेरणा हा माणूसपणाचा गाभा असतो. हे माणूसपण एका गावातले, एकाच प्रकारच्या समाजातले न राहता जागतिक असल्याची जाणीव वाढू लागली ती मात्र बाजारविस्तारामुळे. बाजार देवाणघेवाणीवर आधारित. तिथे कोणी अटी-तटीला येणे बाकीच्या सर्वांसाठी गैरसोयीचे असले, तर अटींना मुरड घालावीच लागते. मानवतेच्या उच्च मूल्यांसाठी वगैरे नसली, तरी बाजाराची गरज म्हणून अशी मुरड घालण्याचे प्रकार जगभरच्या राजकारणातही दिसतात. त्याकडे फक्त धार्मिक अंगाने पाहणे भोळसट म्हणावे की लबाड, या प्रश्नाइतकाच फक्त राजकारण म्हणून पाहणे हे संशयग्रस्ततेचे लक्षण म्हणावे की भोटपणाचे, हाही प्रश्न ग्राह्य मानावा लागेल. त्या प्रश्नांवरचा खल वेळोवेळी व्हावाच. पण त्याहीपेक्षा संस्कृतीचे सर्वव्यापीपण लक्षात घ्यावे.

ते सोप्या शब्दांत असे की, बाजार काय किंवा राजकारण काय, यांमागच्या प्रेरणांपेक्षा संस्कृतीची प्रेरणा मोठी असते. बाजार आणि राजकारण एकमेकांच्या साथीने वाढतात, यात नवल नाही. कारण त्या दोहोंमागच्या प्रेरणा तात्कालिक यशातून पुढली बेगमी करू पाहणाऱ्या ठरतात. आताशा बाजाराने साऱ्या सणांच्या सजावटीचा मक्ता चीनकडे गेला, राजकारणापायी गणपती/ दसरा/ गुढीपाडवा यांसारख्या सणांचे ‘महा’करण होऊ लागले अशा स्टेरॉइड संप्रेरकांपायी संस्कृतीच सुजल्यासारखी वाटते हे खरे. पण संस्कृतीच्या शाश्वत वाढीसाठी मूलभूत असते ती एकमेकांसह राहण्याची, सुखदु:ख वाटून घेण्याची, दुसऱ्याच्या आशाआकांक्षांचा आदर करण्याची प्रेरणा. अशी प्रेरणा भारतभूमीत कधीपासूनचीच रुजलेली आहे, म्हणून तर ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानने फारुखाबादला गंगेवर घाट बांधवून घेतला आणि औरंगजेबाकडून मारला गेलेल्या दारा शुकोहने उपनिषदांचा फारसी तर्जुमा केला; म्हणून तर अगदी गेल्या पिढीपर्यंत बजरंगबली की जय म्हणत तालमीत घुमणारे कैक तरुण मोहरमच्या मिरवणुकीत अंगाला पिवडी फासून वाघ झाले; म्हणून तर हिंदू धर्म जातीपातींमध्ये बंदिस्त केला गेला असूनसुद्धा वासुदेव, पोतराज, जोगतीण अशा भिक्षेकऱ्यांना कुणी वंचित ठेवले नाही… अशी उदाहरणे प्रत्येक वाचकाला स्वानुभवातून सुचतील. त्यासाठी ‘हीच आपली संस्कृती’ असे दावे करणाऱ्या व्हॉट्सअॅप फॉरवर्डांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

वाटून घेणे, दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करणे हे संस्कृतीचे वैशिष्ट्य केवळ भारतापुरते नसून वैश्विक आहे. जगात अन्यत्रही जिथे जिथे माणूसपणाचे निरनिराळे रंग मान्य असतात, तिथे तिथे निकोप संस्कृतीचा प्रत्यय येतो. संस्कृती म्हणजे आमचीच, आमच्यापुरतीच, आम्ही म्हणू तीच, असा हेका धरणाऱ्यांचा रासवटपणा लपत नाही. सणांवर घाला घालणाऱ्या या रासवटांना वेसण घालण्याचे काम कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्यांचे आहेच, पण त्या हेक्यातला सांस्कृतिक पोकळपणा लोकांनी ओळखल्याशिवाय त्या प्रवृत्तीला वेसण बसणार नाही.

Popular Articles