भंडारा :- जवाहरनगर पोलिसांनी अवैध दारू गाळणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली असून, तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून सुमारे ६ लाख ९७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून छापेमारी करण्यात आली.
पहिली कारवाई मौजा संगम बेट येथे करण्यात आली. या ठिकाणी आरोपी दुयोधन शालिक भुरे (वय २४, रा. मकरधोकडा) याच्याकडून ७२० किलो सडवा मोहापास (किंमत १,४४,००० रुपये) जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार शिवणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ४५७/२०२५ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दुसरी मोठी कारवाई मौजा खैरी/पाधी परिसरातील बेट भागात करण्यात आली. येथे आरोपी प्रदीप गुंडाराव चांदेकर (वय २९, रा. संगम पु.) याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून २१६० किलो सडवा मोहापास जप्त करण्यात आला, ज्याची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा यांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा क्रमांक ४५८/२०२५ नोंदवण्यात आला आहे.
तिसरी कारवाई देखील संगम बेट परिसरातच करण्यात आली. आरोपी हिवराज ताराचंद खंगार (वय ४४, रा. तिडी) याच्या ताब्यातून ६०० किलो सडवा मोहापास आणि ४ प्लास्टिक ड्रम असा एकूण १ लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार वरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ४५९/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा, पोलीस हवालदार वरकडे, पोलीस हवालदार शिवणकर व जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.








