हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे औद्योगिक उत्पादन, निर्यात तसेच रोजगारनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून, या क्षेत्राची कार्यक्षमता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. ग्रामीण व निमशहरी भागातील कुशल व अकुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र कृषिनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगारनिर्माते क्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एमएसएमई हे श्रमकेंद्रित असून नवोद्योगांना चालना देणारे क्षेत्र आहे. मात्र वेळेवर कर्ज उपलब्ध न होणे, तारणाचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्यांची कमतरता तसेच विपणन व ब्रँडिंगमधील अडचणींमुळे अनेक उद्योगांची वाढ मर्यादित राहते. यावर मात करण्यासाठी शासनामार्फत कर्ज हमी, अनुदान, कौशल्य विकास व प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ही माहिती आज आयोजित करण्यात आलेल्या ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन 2026’ या कार्यशाळेत ते बोलत होते. आज हॉटेल व्ही.के. महाल रोड, भंडारा येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस सुमारे 250 उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी भूषविले. यावेळी उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग शिवकुमार मुद्यमवार, औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष सुनील रंभाड, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राजू नंदनवार, आर-सेटीचे संचालक निमजे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक संगीता भोंगाडे, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमंत बदर यांची प्रमुख उपस्थिती होती.




