spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साकोली-सेंदुरवाफा परिसरात बिबट्याची दहशत; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, वनविभागाला दिले निवेदन

– पथदिवे सुरू करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा; तातडीने पाहणी करण्याचे आदेश

हंसराज, प्रतिनिधी भंडारा साकोली :- साकोली व सेंदुरवाफा नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. १ व २ मधील बिरसा मुंडा चौक, गजानन बाबा मंदिर परिसर आणि पॉलिटेक्निक कॉलेज समोरील लोकवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. या परिसरात बिबट्या प्रत्यक्ष दिसून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वनविभाग आणि नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, साकोली यांना निवेदन देण्यात आले. या भागात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

बंद पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा

बिबट्याच्या दहशतीसोबतच या परिसरात अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, ज्यामुळे धोका अधिक वाढला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने साकोली/सेंदुरवाफा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. अंधारामुळे बिबट्याचा हल्ला होण्याचा धोका असल्याने तातडीने बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत कार्यालयीन अधिकाऱ्यांची चमू पाठवून सदर भागाची पाहणी करण्याचे निर्देश दिले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे, साकोलीचे नगरसेवक पुष्कर करंजेकर, युवासेना तालुका उपप्रमुख रोहित टेंभरे, युवासेना शहरप्रमुख विवेक काशीवार, प्रज्वल गभणे, नंदकिशोर पटले, निशांत कुडेगावे, उमाकांत मंदुरकर, सतीश शेंडे, सुमित दुर्वे यांसह असंख्य शिवसैनिक, परिसरातील नागरिक आणि नगरपरिषद कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.

Popular Articles