spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात होणार राफेल लढाऊ विमानांची बांधणी

नागपूर :- भारतीय हवाई दलासाठी ११४ राफेल एफ४ लढाऊ विमाने खरेदी करण्याबाबत भारत आणि फ्रान्स यांच्यातील प्रमुख बाबींवर एकमत झाले असून, या कराराची औपचारिक प्रक्रिया २०२६ अखेर किंवा २०२७च्या सुरुवातीस पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाअंतर्गत १८ विमाने थेट ‘फ्लाय-अवे’ स्थितीत खरेदी केली जातील, तर उर्वरित विमाने भारतात तयार केली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने ६० टक्क्यांपर्यंत स्वदेशी घटकांचा वापर करण्यात येणार असून ही प्रक्रिया सी-२९५ वाहतूक विमान प्रकल्पाच्या धर्तीवर असेल. सध्या ‘तेजस’ विमानात ६२ टक्के स्वदेशी घटक आहेत.

या करारामध्ये भविष्यात राफेलचे एफ५ आवृत्तीत अद्ययावत करण्याचा पर्यायही असेल. सध्या भारतीय हवाई दलात सेवेत असलेली सर्व राफेल विमाने एफ४ मानकांनुसार अपग्रेड केली जाणार आहेत. सध्या वापरात असलेली विमाने एफ३-आर प्लस प्रकारातील असून, त्यामध्ये भारतासाठी खास १३ सुधारणा करण्यात आल्या आहेत.

राफेल एफ४ मानकांमध्ये उपग्रह व इन्ट्रा-फ्लाइट संपर्क प्रणाली, सॉफ्टवेअर रेडिओ, प्रगत संप्रेषण सर्व्हर यांचा समावेश असून, नेटवर्क-केंद्रित युद्धक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. हे मानक भविष्यातील फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम साठीही मार्ग मोकळा करते.

करारावर २०२७च्या सुरुवातीस स्वाक्षरी झाल्यास, पहिल्या १८ विमानांचा पुरवठा २०३० पासून सुरू होईल. संरक्षण मंत्रालयाकडून ‘अ‍ॅक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी’ मंजूर झाल्यानंतर अंतिम खर्च व तपशील निश्चित केले जातील.

Popular Articles