spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाखांदूरचा ‘धोकादायक गुंड’ नितेश भुते जेरबंद; एम.पी.डी.ए. अंतर्गत भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

– दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई; पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा दणका

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखांदूर :- लाखांदूर परिसरात आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजविणाऱ्या नितीन उर्फ नितेश पुरुषोत्तम भुते (३४, रा. लाखांदूर/प्लॉट) या ‘धोकादायक गुंडा’वर अखेर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी यासंदर्भात स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर, त्याची रवानगी भंडारा जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

२०१० पासून गुन्हेगारीत सक्रिय

नितीन भुते हा गेल्या १५ वर्षांपासून (सन २०१०) गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. त्याच्यावर लाखांदूर पोलीस ठाण्यात चोरी, मारामारी, जबरी चोरी आणि घातक शस्त्रे बाळगून समाजात दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. सर्वसामान्यांच्या मनात त्याच्याबद्दल मोठी भीती होती. अशा विघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली लाखांदूर पोलिसांनी नितेश भुते याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला स्थानबद्ध करून जिल्हा कारागृह, भंडारा येथे दाखल करण्याचे आदेश पारित केले.

या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पवनी) मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, स.पो.नि. गेद्रे व स्थानिक गुन्हे शाखा आणि लाखांदूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Popular Articles