spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जीएसटी क्रमांक सुरू करण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना राज्य कर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भंडारा येथील राज्य कर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. मनीष मुरलीधर सहारे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या वर्ग-२ च्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार नशिम रहीम शहा (वय ३५, रा. पवनी) हे टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांचे क्लाइंट प्रमोद सोनकुसरे यांचा ऑक्टोबर २०२४ पासून बंद असलेला जीएसटी क्रमांक (27AAOCP2142H1ZC) पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज नागपूर येथील वस्तू व सेवा कर विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी भंडारा कार्यालयातील राज्य कर अधिकारी मनीष सहारे यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

हा जीएसटी क्रमांक सुरू करून देण्यासाठी सहारे यांनी तक्रारदाराकडे ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत भंडारा एसीबीकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:२५ च्या सुमारास एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मनीष सहारे यांना पथकाने ताब्यात घेतले.

आरोपी मनीष सहारे हे मूळचे नागपूर येथील राजाबक्षा भागातील रहिवासी असून सध्या भंडारा येथील विद्यानगर, गणेशपूर येथे इश्वरदास लाखडे यांच्या कडे भाड्याने राहतात. त्यांच्या विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा (अ.क्र. १४५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडाराचे पोलीस उपअधीक्षक लोहार आणि त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

शासकीय कामासाठी कुणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.