पांढरकवडा :- शहरातील हनुमान वॉर्ड परिसरातील सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यामधे एक दिवसाच्या जन्मलेल्या जिवंत मुलीला टाकण्यात आल्याची घटना बुधवारी ता. २८ पहाटे ३:३० ते ४ दरम्यान उघडकीस आली. या गंभीर तथा मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. प्राप्त माहितीनुसार पांढरकवडा शहरातील प्रभाग क्र. ८ मधील हनुमान वॉर्ड परिसरातील बोरेले वाईन शॉपच्या बाजुला सांडपाणी वाहून जात असलेल्या नाल्यात कु्णीतरी अंदाजे दीड ते दोन तासंपूर्वी जन्मलेल्या मुलीला टाकून दिले. मुलीच्या रडण्याचा आवाज पहाटे फिरायला जाणाऱ्या एक दोन नागरिकांना ऐकू आला. तसेच कुत्र्यांचा भुंकण्याचा पण आवाज येत होता. काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून त्या ठिकाणी लोकं गोळा झाले, बाळ रडण्यांच्या आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता स्त्री जातीचे नुकतेच जन्म झालेले नवजात बाळ दिसून आले. त्या बाळाच्या अजूबाजूला मोठे दगड ठेवण्यात आले होते. बाळ जिवंत असल्यामुळे तत्काळ उपजिल्हा रुणालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व नागरिकांच्या मदतीने या बालिकेला त्वरित रुग्णालयात दाखल केले. नवजात बालकाला पहाटे साडेतीन वाजता दरम्यान नाल्यात टाकल्याची तक्रार केतन कटकोजवार यांनी पोलिस ठाण्यात दिली. ठाणेदार लहजी तावरे यांनी बालिकेच्या पालकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जलद कारवाई करीत बालिकेची आई अर्चना सुनील शिवरकर (वय २८) व वडील सुनील दिंगाबर शिवरकर (वय ३१, रा. दोघेही रा. नेहरू वॉर्ड, पांढरकवडा) यांना दोन तासांत शोधून काढले. ही कारवाई पोलिस निरीक्षक लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, जमादार विलास जाधव, दुधना मसराम, ज्योत्स्ना तलांडे, प्रफुल्ल पावसेकर यांनी पार पाडली.








