– महामंडलेश्वर सुनील शास्त्री महाराजांचे प्रभावी मार्गदर्शन
यवतमाळ :- यवतमाळ शहरातील संत गाडगेबाबा वाचनालय, मुंगसाजी महाराज मंदिराजवळील अनुश्री पार्क येथे शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सकल हिंदू समाज, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विशाल हिंदू संमेलनाला’ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. शहरासह परिसरातील धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी झाले होते.
या संमेलनाचे मुख्य आकर्षण महामंडलेश्वर सुनील शास्त्री महाराज यांचे ओजस्वी व प्रबोधनपर मार्गदर्शन ठरले. आपल्या प्रभावी भाषणातून महाराजांनी हिंदू धर्माची परंपरा, संस्कृतीचे महत्त्व आणि बदलत्या काळात तरुणांनी जपावयाची नैतिक मूल्ये यावर सखोल मार्गदर्शन केले. हिंदू समाजात एकोपा, संघटन व धार्मिक जागृती वाढवण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी महाराजांनी तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, चारित्र्य आणि राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक कार्य करावे, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
संमेलनस्थळ संपूर्णपणे भगव्या पताकांनी सजवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष तसेच युवक-युवतींची मोठी उपस्थिती या कार्यक्रमात पाहायला मिळाली, ज्यातून धार्मिक व सामाजिक उपक्रमांबाबत नागरिकांचा वाढता सहभाग स्पष्ट झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अविनाश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीने चोख नियोजन व व्यवस्थापन केले. आयोजन समितीचे सदस्य विठ्ठल मिसाळ, विठ्ठल राठोड, विलास गायधने, किशोर जीवतोडे, मुकुंद वाघमारे, मंगेश बाविस्कर, मनोहर दीक्षित, संजय गाडे, इंगोले काका, पियुष दुधनकर, यश वरघने, राजेंद्र बोपचे तसेच सुषमा राऊत, लता देवतळे आणि गरड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सकल हिंदू समाज, यवतमाळ यांच्या वतीने उपस्थित जनसमुदायाचे आभार मानण्यात आले. संपूर्ण परिसर “जय श्री राम” च्या घोषणांनी दुमदुमून गेला. हे संमेलन केवळ धार्मिक प्रवचनापुरते मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारे व एकतेचा संदेश देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले.




