नागपूर, १९ : महावितरणच्या केळवद कार्यालयावर गुरुवारी (दि. 17 जुलै) रोजी स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांत वाढ झाल्याच्या तक्रारी घेऊन आलेल्या ग्राहकांना महावितरणने तात्काळ दिलासा दिला आहे. सर्व मोर्चेकरी ग्राहकांच्या मीटरवरील वीज वापराच्या नोंदी तपासून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
महावितरणच्या सावनेर विभागातील केळवद परिसरात महावितरणने सुमारे 450 सदोष मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावले आहेत. हे मीटर बदलल्यानंतर काही ग्राहकांना अवास्तव वीजबिले आल्याच्या तक्रारी होत्या, ज्यामुळे त्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.
यापैकी बहुतांश ग्राहकांना उन्हाळ्यातील सरासरी वीज वापराचे बिल मिळाले होते, कारण जुन्या मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर नवीन मीटर बसवण्यात आले होते. यामुळे त्यांना वाढीव रकमेची बिले दिसली. केवळ दोन ग्राहकांनाच असामान्य बिले मिळाल्याचे निदर्शनास आले, जी तात्काळ दुरुस्त करून त्यांना देण्यात आली. असे महावितर्णतर्फ़े स्पष्ट करण्यात आले.
मीटर बदलण्यात आलेल्या सर्वच ग्राहकांना वाढीव बिल आलेले नाही. काही मीटरचा डेटा महावितरणच्या बिलिंग सिस्टिममध्ये गेला नसल्यामुळे त्या ग्राहकांना सरासरी वीज वापराचे बिल मिळाले आहे. अशा सर्व ग्राहकांचे मीटर तपासणी करून त्यांना सुधारित बिले दिली जातील, असे आश्वासन महावितरणने मोर्चे क-यांना दिले आहे.
“स्मार्ट मीटरमुळे अवाढव्य वीजबिल आले,” असे म्हणणे चुकीचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. सावनेर तालुक्यात आतापर्यंत जवळपास चार हजार स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. जिथे रीडिंग रिप्लेसमेंट डेटा सिस्टिममध्ये आला नाही, तिथे सरासरी वीज वापराची वाढीव बिले आली आहेत. ज्या ग्राहकांचे बिल वाढीव आलेले आहे, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्याकडील मीटरची तपासणी केल्यानंतर त्यांना सुधारित बिल देण्यात येईल. वाढीव बिलाची समस्या असल्यास, ग्राहकांनी तात्काळ महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांनी मोर्चेकरी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच, मीटर बदलताना वीज वापराच्या नोंदींचे वाचन करून गरज भासल्यास समांतर मीटर लावून नोंदी तपासण्याच्या सूचना देखील दिलीप राऊत यांनी सर्व जनमित्रांना दिल्या आहेत.
@filephoto




