spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पियूष बुरडे यांची चाणक्य नीति, जेमतेम संख्याबळ असूनही काँग्रेसला बाजूला सारत सर्व विषय समित्या भाजपच्याच खात्यात

– खापा नगरपरिषदेत स्थायी व विषय समितीची स्थापना, स्थायीच्या समितीवर भाजपचाच कब्जा

खापा, वार्ताहर :- खापा नगरपरिषद मध्ये दि.२९ जानेवारी गुरुवारला विषय समिती आणि स्थायी समित्या स्थापन करण्यात आली. नियोजन व विकास सभापती सुनील सुधाकर पाहुणे, सार्वजनिक बांधकाम सभापती किशोर (बाल्या) रमेश आष्टणकर, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, महिला व बालकल्याण सभापती वैशाली चंद्रकांत लिखार, पाणीपुरवठा व आरोग्य सभापती रोशनी शेखर डेरे, स्थायी समिती सदस्य रवी गेंदलाल परतेकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दहा सदस्यीय संख्याबळ असलेल्या भाजपने सर्वपरीने नगरपरिषदेत सत्ता मिळवली आहे. सभापती निवडणूक प्रक्रिये करिता तात्पुरते मुख्याधिकारी म्हणून धनंजय सरनाईक यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात आले होते. पीठासीन अधिकारी अर्शिया जुही यांनी निवडणूक प्रक्रिया आयोजित केली. अध्यक्ष पियुष बुरडे आणि सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

“विषय समिती निवडणुकीत खापा नगरपरिषदेत काँग्रेसचा सुपडा साफ”

खापा नगरपरिषदेत पार पडलेल्या विषय समिती व स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपच्या खापा नगर विकास आघाडीने सर्वच समित्यांवर वर्चस्व मिळवले आहे. भाजपकडे जेमतेम संख्याबळ असतानाही नगराध्यक्ष पियूष बुरडे यांच्या चाणक्य नीतीमुळे सर्व पाच विषय समित्या तसेच स्थायी समितीतील सदस्यपदे भाजपच्या ताब्यात आली आहेत. या निवडणूक निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

“पदग्रहण सोहळ्यात अनुपस्थित काँग्रेसला जोरदार झटका”

नुकताच सहा जानेवारीला नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला होता. या सोहळ्यात काँग्रेसकडून निवडून आलेले दहाही नगरसेवक हे अनुपस्थित होते. याचाच फलस्वरूप समित्या पासून वंचित रहावे लागले. अशी कुजबूज जनतेमध्ये सुरू आहे.

“काँग्रेसमध्ये उडाली खळबळ”

या निकालामुळे काँग्रेस गटात खळबळ उडाली असून अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

“काँग्रेसला संधी, परंतु नेतृत्वाचा प्रश्न”

काँग्रेसलाही विषय समिती व स्थायी समितीमध्ये पद प्राप्त करण्याची संधी होती. काँग्रेसचे दहा नगरसेवक इतके संख्याबळ असूनसुध्दा वरिष्ठ नेतृत्वाकडून उचित निर्णायक मार्गदर्शन मिळाले नाही. मात्र, ही सर्व किमया घडवून आणणारे नेतृत्व काँग्रेसकडे असूनही समित्यांच्या पदापासून वंचित रहावे लागले.

“निवड प्रक्रियेत संभ्रम”

विषय व स्थायी समिती सभापती, सदस्य निवड दरम्यान अनुमोदक आणि सूचक तसेच समितीच्या सदस्यांची समितीमध्ये झालेल्या पुनरावृत्तीला घेऊन काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

“चर्चेला उधाण”

काँग्रेसकडे दहा नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने कमीत कमी दोन समित्या काँग्रेसच्या खात्यात येईल अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. परंतु भाजपचे नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक अशी दहा सदस्यीय भाजपने खापा नगर विकास आघाडी तयार केली. त्यातच नगराध्यक्ष यांनी नगर परिषद अधिनियम १९६५ च्या अधिनियम कलमांचा वापर करत सर्व समित्यांवर विजय मिळवला. तर उपाध्यक्ष यांनीही नगर परिषद अधिनियम १९६५ च्या अधिनियम कलमांचा वापर करत नियोजन समितीवर वर्चस्व गाजवले.

Popular Articles