नागपूर १९: समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी केवळ राजकीय घोषणांचे नव्हे, तर संघर्षशील विचारांचे सामर्थ्य आवश्यक आहे. अण्णाभाऊ साठे हे असे साहित्यिक होते की ज्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना लेखणीतून, पोवाड्यांतून, लोकनाट्यांमधून जनतेपर्यंत नेले. त्यांच्या लेखनातून बहुजनांचे दुःख, संघर्ष आणि स्वाभिमान जागवला गेला. हे लेखन समाजाच्या विचारांचे रणशिंग ठरले, असे ठाम प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई कवाडे यांनी शुक्रवारी केले. याबाबतची माहिती प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
शुक्रवारी अन्नाभाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिमा ताई जयदीप कवाडे, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजयजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुमित डोंगरे, पूर्व विदर्भ महासचिव डॅनी शामकुंवर, पूर्व विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा सुचिता कोटांगळे, महिला आघाडी नागपूर अध्यक्षा प्रतिभा मानवटकर, विदर्भ संघटक अंकीत धुपे, नागपूर उपाध्यक्ष रीजवान शेख, सोमलवाडा अध्यक्ष सुनील कांबले, पूर्व नागपूर अध्यक्ष शितल बोरकर, पूर्व नागपूर संघटक सुनील मैश्राम, नागपूर ग्रामीण महिला आघाडी अध्यक्षा सुनिता ताई शेंडे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान मानवटकर यांची उपस्थिती होती. जयदीप कवडे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सखोल ऊहापोह करत सांगितले की, बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे मूल्याधिष्ठित समाज घडवण्याचे स्वप्न पाहिले, त्या विचारांची मशाल अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या तेजाने पुढे नेली. त्यांच्या लेखणीतून बाबासाहेबांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचले. त्यांनी स्वतः म्हटले आहे बाबासाहेब माझे आदर्श होते. त्यांनी मला झोपलेल्या जनतेला जागे करण्याची ताकद दिली. अण्णाभाऊंच्या पोवाड्यांमधून या विचारांचे प्रबोधन घडत गेले.
जयदीप कवाडे पुढे म्हणाले, फकिरा ही केवळ कादंबरी नव्हे, तर ती एक विचारांची चळवळ होती. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचे बळ अण्णाभाऊंनी फकिराच्या रूपाने दाखवून दिले. ही कादंबरी म्हणजे एक समांतर क्रांती होती यात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक याचा संदर्भ होता. जयदीप कवाडे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेत स्पष्ट केले की, हा माणूस कोळशाची पोती उचलून पोट भरत होता, आणि त्याच वेळी समाजाचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडत होता. त्यांच्या प्रत्येक ओळीत समाजातील शोषणाचा आक्रोश आहे, आणि त्याचबरोबर परिवर्तनाची प्रेरणाही. अरे संसार संसार, जसा वाटी घासाखातर…सारख्या ओळी सामान्य माणसाच्या संघर्षाचा कलात्मक अविष्कार आहेत. आजच्या तरुणांना दिशा दाखवण्याचे काम अण्णाभाऊंचे लेखन करू शकते. नव्या पिढीला फेसबुक आणि व्हाट्सॲपपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे विचारांचे भान. अण्णाभाऊ म्हणजे त्या विचारांचे मूळ आहेत. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचारच नव्हे, तर लोकशाहीच्या मुळाशी जाणारा प्रबोधनात्मक आघात केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन हा केवळ औपचारिक अभिवादनाचा दिवस नसून, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण बाबासाहेब आणि अण्णाभाऊंच्या स्वप्नातील समता, न्याय आणि स्वाभिमान युक्त समाजासाठी काय करत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित पोस्टर्स, ग्रंथ आणि संदेशपत्रकांचे वितरण करण्यात आले. समारोप अण्णाभाऊंच्या प्रेरणादायी गीतांनी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
स्वाभिमानाच्या लढ्यात अण्णाभाऊंचे लेखन हे विचारांचे रणशिंग ठरले : जयदीप कवाडे


पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अन्नाभाऊ साठे यांना अभिवादन







