spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहरात व परिसरात पिसाळलेल्या कुत्रीची दहशत, कुत्र्यांचा बंदोबस्त लावा नागरिकांची आर्त हाक

– अनेक जणांना केले जखमी, नागरिकांच्या पुढाकाराने कुत्रीला केले बंदिस्त

खापा, वार्ताहर :- खापा शहरातील प्रभाग तीन व चार परिसरात एका पिसाळलेले कुत्रीने दहशत माजवत जवळपास २० ते २५ जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या काहींवर प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे प्रथमोपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्याना प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे पाठविण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पिसाळलेल्या कुत्रीने अनेक लोकांवर हल्ला करत रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाला चावा घेतल्याची माहिती पसरताच परिसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमध्ये सुमारे वीस जणांना चावा घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. मागील दोन तीन दिवसांपासून या कुत्रीने शालेय विद्यार्थी, पदचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींवर कुत्रीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे जखमींवर उपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूर येथे पाठवण्यात आले. या घटनेत नगरपालिकेने थातूरमातूर कारवाई करत या पिसाळलेल्या कुत्रीचा पाठलाग केला, परंतु त्याने नगरपालिका कर्मचाऱ्यांना चकमा देत पडला.

या घटनेमध्ये जयंत परतेती, चिमु परतेती, राजेश खुबाळकर, राजश्री गाठे, घायवट, तुलाराम भस्मे इत्यादींसह लहान मुल, महीला, पुरुषांना या घटनेमध्ये पिसाळलेल्या कुत्रीने अनेकांना जखमी केले आहे. तसेच खापा नजीकच्या गावातील वाकोडी, तिघई परिसरातील नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

प्रभाग तीनचे नगरसेवक संजय सोनकुसळे, प्रभाग चारच्या नगरसेविका कविता स्वप्निल धराडे तसेच प्रभाग सहाच्या नगरसेविका वैशाली अखिल लाड तसेच प्रभागातील महिला, नागरिक यांच्यासह नगराध्यक्ष पियूष बुरडे यांना पिसाळलेली कुत्री व शहरातील कुत्र्यांचे बंदोबस्त करण्याकरिता निवेदन देण्यात आले.

“प्रशासन सुस्त; नागरिक त्रस्त”

शहरातील परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अंगणात खेळणाऱ्या लहान मुले, शालेय विद्यार्थी, पादचाऱ्यांवर कुत्रे अचानक हल्ला करीत आहेत. खापा शहरात मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. दुसरीकडे प्रशासन सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

“अखेर त्या कुत्रीला केले बंदिस्त”

शहरातील नागरिक, नगर परिषद कर्मचारी यांच्या सहाय्याने त्या पिसाळलेल्या कुत्रीला बंदिस्त करण्यात आले. शहरात असे पिसाळलेले कुत्रे आढळल्यास नगरपालिकेची संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष पियुष बुरडे यांच्यातर्फे करण्यात आले.

मनोगत :- 

१) खापा शहरातील परिसरात पिसाळलेल्या कुत्रीच्या हल्ल्यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. आरोग्य केंद्रात त्यांना प्राथमिक प्रतिबंधक लस देण्यात आली. सर्व रुग्णांचे हातापायाचे तसेच शरीराच्या इतर भागांचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले आहेत. गंभीर जखमा असल्याने त्यांना उपचारांसाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविले आहे.

– डॉ. दीक्षा भिरड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खापा.

२) पिसाळलेल्या कुत्रीचा सकाळपासून नगरपरिषद कर्मचारी शोध घेत होते. शहरातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांना सांभाळावे तसेच नागरिकांनीही सतर्क रहावे. नगर प्रशासन त्या कुत्रीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत त्या कुत्रीला बंदिस्त केले. कुणालाही भटकी व चावणारी कुत्रे अथवा कोणतेही जनावरे आढळल्यास त्यांनी तातडीने नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा. – पियुष बुरडे, नगराध्यक्ष, न. प. खापा.

Popular Articles