spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनतेच्या हक्कासाठी फासावर चढायलाही तयार!”; निलंबनानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे कडाडले

– राहुल गांधींना रोखल्याच्या निषेधार्थ संसदेत आक्रमक आंदोलन; भंडारा-गोंदियाच्या खासदारावर निलंबनाची कारवाई

हंसराज, प्रतिनिधी भंडारा

नवी दिल्ली :- “संसद ही सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, पण आज तिथेच विरोधकांचा गळा दाबला जात आहे. जनतेचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी मला निलंबनासच काय, पण फासावर चढवले तरी मी मागे हटणार नाही,” अशा संतप्त शब्दांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलनात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांना संसदेच्या उर्वरित कामकाजातून निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर डॉ. पडोळे यांनी सरकारवर तीव्र प्रहार केला.

लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप

निलंबनानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. पडोळे म्हणाले की, जेव्हा आम्ही देशाची सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, आदिवासी आणि दलितांचे ज्वलंत प्रश्न मांडतो, तेव्हा सत्ताधारी पक्ष मुद्दाम गोंधळ निर्माण करून आमचा आवाज दाबतो. सत्ताधारी पक्ष बहुमताचा गैरवापर करून लोकशाहीची गळचेपी करत असून, संसद केवळ सरकारचे निर्णय रेटणारी संस्था बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

लढा रस्त्यावरही सुरूच राहणार

“हे निलंबन माझ्या कर्तव्याची शिक्षा असेल, तर ती मला मान्य आहे. हा लढा केवळ एका खासदाराचा नसून देशातील कोट्यवधी जनतेच्या हक्कांचा आहे,” असे सांगत डॉ. पडोळे यांनी स्पष्ट केले की, संसदेत असो वा रस्त्यावर, जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांचा आवाज कधीही थांबणार नाही.

या निलंबनामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.

Popular Articles