spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहरात पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष, भविष्यात नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न उभारण्याची शक्यता

खापा, वार्ताहर :- एकीकडे पाणी वाचवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. परंतु स्वतः पाणी वाचवण्यासाठी प्रशासन हे निराशामय दिसून येत आहे.

प्रभाग पाच मधील आवते मेडिसिन जवळील पाण्याच्या व्हॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर पाणी गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत आहे. वॉलच्या खालील पाईपलाईन ही फुटली असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे, असे कर्मचाऱ्याद्वारे सांगण्यात आले.

एकीकडे दिवसा एक तास पाणीपुरवठा करून पाणीबचतीचे धोरण राबवायचे अन् दुसरीकडे पाणी गळतीकडे दुर्लक्ष करायचे. पाण्याचा हा अपव्यय थांबवून पाणीपुरवठा विभागाने पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. दिवसा एक तास पाणीपुरवठा करून पाणी बचतीसाठी प्रयत्न केला जाता आहे. तरी देखील पाणी टंचाईमध्ये पाण्याच्या पाईपमधून व व्हॉल्व्हमधून पाणीगळती, यामधून पाण्याचा होणारा अपव्यय ही नित्याचिच बाब झाली आहे. ती अनेकदा दुरुस्त करण्यात आली. तरीही कसल्याही प्रकारे तोडगा निघालेला नाही.

“प्रशासक कार्यकाळात नागरिकांच्या समस्येवर दुर्लक्ष”

मागील दोन- तीन वर्षापासून प्रशासक असूनही या समस्येच्या तोडगा काढण्यात आला नाही, ही चिंतेची बाब आहे. प्रशासककाळात उद्भवलेल्या समस्येवर दुर्लक्ष केल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

“भविष्यात नागरिकांच्या प्रकृतीचा सवाल”

सध्या स्थितीत दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे मध्यप्रदेशातील इंदौर येथे अनेक नागरिकांच्या तब्येती खराब झाल्या. तर अशाच प्रकारे मागील महिन्यात सावनेर तालुक्यातील ढालगाव खैरी येथे नळवाहिनीतून दूषित पाणीपुरवठा झाल्याने अनेक लोकांच्या प्रकृती बिघडल्या. लिकेज पाइपलाइन ही गटाराच्या बाजूने असल्याने अशाच प्रकारे या पाण्याचा गळतीमुळे या पाण्यासोबत दूषित पाण्याचा संपर्क आल्याने प्रभाग पाचमधील जनतेला काही बाधा होणार की काय? असा प्रश्न नागरिकांनी नवनियुक्त लोकप्रतिनिधींसमोर उपस्थित केला आहे.

मनोगत :-

१) पाणीपुरवठा विभागाने त्वरित या समस्येचे निराकरण करावे. अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल.

– अफसर छवारे, नागरिक.

२) यातून नागरिकांना काही त्रास झाल्यास आणि जर कुणाच्या प्रकृतीमध्ये बिघाड आल्यास यास सर्वस्वी पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील.

– बब्बू बावा शेख, ज्येष्ठ नागरिक.

३) युद्ध स्तरावर तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येईल. भविष्यात नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होणार नाही, याची दखल घेतल्या जाईल.

– पियूष बुरडे, नगराध्यक्ष, खापा.

४) संबंधित वॉल व पाईपलाईन ही अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल.

– रोशनी शेखर डेरे, नगरसेवक तथा सभापती पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, न. प. खापा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.