spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्याचा आज समारोप

– पद्मश्री शीतल महाजन व गिर्यारोहक बिमला नेगी देऊस्कर यांचे प्रेरक व्याख्यान

नागपूर :- शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा रेशिमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळावा २०२६ चा समारोप गुरूवार (ता. ५) सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन आमदार मोहन मते व आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये 31 जानेवारीला झाले होते. या मेळाव्यात अडीचशे पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. नागरिकांचा देखील या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दररोज लाखोंची उलाढाल देखील मेळाव्यातील विविध दालनाद्वारे होत आहे.

दररोज सायंकाळी मेळाव्याला येणाऱ्यासाठी संगीत व मनोरंजनाचे कार्यक्रम ही आयोजित केले आहेत. त्यामुळे मेळाव्यातील स्टॉलला भेट देणाऱ्यांना मनोरंजनही मिळत आहेत. या मेळाव्याचा समारोप 5 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचे प्रेरक व्याख्यान आयोजित केले आहे. यात पद्मश्री उपाधीने सन्मानित झालेल्या स्काय डायव्हर शीतल महाजन तसेच प्रसिद्ध गिर्यारोहक बिमला नेगी देऊसकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे बाधाओं से परे या मानसिक आरोग्य कार्यशाळेत ऋद्धी तहलरामानी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती मनपाच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली. मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ‘डीजे इन साडी’ हा महिलांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Popular Articles