spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंतप्रधानांबाबतचे काँग्रेस खासदारांचे वर्तन संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारे

– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र

मुंबई :- देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये पंतप्रधानांना भाषण देता येईल असे सुरक्षित वातावरण नव्हते ही दुर्दैवाची बाब आहे. या घटनेचा भारतीय जनता पार्टी धिक्कार करते. संसदेमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन न करता काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनासमोर येऊन त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल असे वर्तन करत आंदोलन केले. संसदेच्या समृद्ध परंपरेला आणि इतिहासाला काळीमा फासणा-या काँग्रेस खासदारांच्या या वर्तनाचे समर्थन उबाठा गट आणि संजय राऊत करत आहेत हे अत्यंत चीड आणणारे आहे असे शरसंधान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन साधले.

यावेळी बन म्हणाले की, कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करण्याचे काम काँग्रेसने आणि विरोधकांनी केले. देशविकासासाठी पंतप्रधान करत असलेली कामे काँग्रेसच्या डोळ्यात खुपतात. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून उबाठा गट आणि काँग्रेसने सातत्याने असूयेपोटी टीका केली आहे. ‘मौत का सौदागर’, ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’ या आणि अशा शब्दांत टीकेचा टीपेचा सूर लावला गेला आहे. बिहार निवडणुकीवेळी तर कहर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल हिणकस वक्तव्य केले होते.

उद्धव ठाकरे, राऊत डरपोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि देशाच्या जनतेच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी झटत आहेत. भारताला विकासाची नवी उंची प्रदान करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोवीडमध्ये जनता मरण यातना भोगत होती, देशोधडीला लागत होती, अशा स्थितीत अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसून सरकार चालवत होते. जनतेच्या सुरक्षेची, रक्षणाची जबाबदारी असलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेव्हा जबाबदारीपासून पळ काढत घरात लपून बसले होते. शिंदे आणि त्यांनतर फडणवीस सरकार काळात उद्धव ठाकरे घरात लपून बसले होते असा हल्लाबोल बन यांनी केला.

पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची पात्रता राऊतांची नाही असे म्हणत बन यांनी राऊतांचा समाचार घेतला. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवत सलग तीन वेळा त्यांना पंतप्रधानपदी निवडून दिले आहे. राऊत हे अनेक वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनी खासदार म्हणून फंडातून एकही लोकहिताचे काम केले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही अशी प्रखर टीका बन यांनी केली.

भारताची प्रगती राऊतांना बघवत नाही

भारत अमेरिका व्यापार करार करून भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवी उंची प्राप्त होणार आहे. भारताची नव्हे तर पाकिस्तानची मान उंचावण्याचे कायमच राऊतांचे धोरण आहे असा घणाघात बन यांनी केला. भारताची बदनामी करणार असाल तर जशास तसे उत्तर भाजपा आणि जनता देईल असा इशाराही त्यांनी दिला.

एपस्टीन फाइलबद्दल राऊतांनी बोलू नये. बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी नको त्या विषयात बोलू नये. पाटकर फाइल काढली तर राऊतांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे बन यांनी सुनावले. माताभगिनीना कसा त्रास देण्यात आला त्याचे पितळ पाटकर फाइलमुळे उघडे पडेल असेही बन यांनी नमूद केले.

‘ज्यांचे मीठ खावे त्यांची चाकरी करावी’ राऊतांना खोचक सल्ला

संजय राऊत यांची जीभ राहुल गांधी आणि शरद पवार यांचे कौतुक करताना झडत नाही. उद्धव ठाकरेंचे कौतुक करताना राऊत दिसत नाहीत. किमान ज्यांचे मीठ खाता त्यांच्याशी तरी इमान राखा असा खोचक सल्ला बन यांनी राऊतांना दिला.

Popular Articles