spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान खरेदीत गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली :- शेतकऱ्यांच्या हितावर गदा आणणाऱ्या कोणत्याही गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष होणार नाही तसेच बोगस धान खरेदी प्रकरणात सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयोजित जिल्हा पणन व सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन, आरमोरीचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे, जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बोगस धान खरेदी प्रकरणात आतापर्यंत शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी का करण्यात आलेली नाही, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून पुढील न्याय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीदरम्यान आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था अंतर्गत फरी येथे सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सहपालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. या तक्रारींमध्ये शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १०० रुपयांची अनाधिकृत पावती घेणे, शासनाने निश्चित केलेल्या ४० किलो मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच ४१.६०० किलो धान खरेदी करणे, नोंदणीप्रमाणे खरेदी न करणे तसेच हमालांना शासनाकडून देय असलेली हमालीची रक्कम अदा न करणे या बाबींचा समावेश आहे.

या सर्व तक्रारींची दखल घेत सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाची आमदार रामदास मसराम व आरमोरीचे उपविभागीय अधिकारी दोघांनी संयुक्त चौकशी करण्याचे व सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांना दिले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा पुढील बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल आणि हे प्रकरण मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles