spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला ५ वर्षे कारावास : साकोली येथील प्रकरणाचा भंडारा न्यायालयात निकाल

हंसराज,प्रतिनिधी भंडारा साकोली दि. १० :- साकोली तालुक्यातील चांदोरी (उसगाव) येथे क्षुल्लक कारणावरून चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोहनलाल किसन मेश्राम (वय ४५, रा. चांदोरी/उसगाव, ता. साकोली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर घटना २३ मार्च २०१९ रोजी मौजा चांदोरी येथे घडली होती. जखमी मार्कंड ऊर्फ पपेश हेमराज कापगते (वय ३२) याने आरोपी मोहनलाल याला “तू माझ्या आईला शिवीगाळ का केली?” असे विचारले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने मार्कंडच्या डाव्या हाताच्या भुजेवर, गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी फिर्यादी दयाराम विठोबा रुखमोडे (५०) यांच्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८७/२०१९, कलम ३०७ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रमाकांत खत्री यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ठोस पुराव्यांच्या आधारे, जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. शाह यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा निकाल दिला.

न्यायालयाने आरोपी मोहनलाल मेश्राम याला कलम ३०७ भा.द.वि. मध्ये फौंजदारी प्रक्रिया संहितेची कलम २३५(२)अंतर्गत आरोपीस दोषी धरून ५ वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये द्रव्यदंड सुनावला. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने सक्त मजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, साकोलीचे ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दोषसिद्धी कक्षाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार धनराज रोहणकर (ब.नं. ७०१) यांनी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून मोलाची भूमिका बजावली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.