spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर-बपेरा महामार्गाच्या दुरवस्थेविरुद्ध सिहोरा परिसरात आज ‘रास्ता रोको’

– प्रशासनाच्या आश्वासनाला वैतागून आंदोलक आक्रमक; उपोषणाचा आज दुसरा दिवस

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- तुमसर ते बपेरा या राज्यमार्गाची झालेली अत्यंत दुरवस्था, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून या मार्गावर ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. चुल्हाड बस स्थानक येथे या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाने आता आक्रमक रूप धारण केले आहे.

तुमसर-बपेरा हा मार्ग सध्या ‘मृत्यू मार्ग’ म्हणून ओळखला जात आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदने दिली, तात्पुरती आंदोलने केली, मात्र दरवेळी प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने आता आंदोलकांनी “अभी नही तो कभी नही” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

बिनाखीचे उपसरपंच राजेंद्र बघेले आणि सामाजिक कार्यकर्ते विनेश गजभीये यांनी ८ फेब्रुवारीपासून चुल्हाड बस स्थानकावर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने आज १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून तुमसर ते बपेरा दरम्यान ठिकठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या जनआंदोलनाला डोंगरला ते बपेरा परिसरातील सर्व सरपंचांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला बळ दिले आहे. यामध्ये उमेश तुरकर, देवानंद लांजे, तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख देवचंद ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले, उपसभापती सुभाष बोरकर, माजी सभापती रमेश पारधी, माजी सभापती कलाम भाई शेख, रामू कटरे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्याने चालणे कठीण झाले असून दुर्दैवी घटनांची मालिका सुरूच आहे. या घटना रोखण्यासाठी आणि कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र बघेले व विनेश गजभीये यांनी केले आहे. आज होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रशासनावर आता जनतेचा मोठा दबाव निर्माण झाला आहे.

Popular Articles