Tuesday, February 10, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरसंघचालकांचे समाजचिंतन

भाजप आणि अन्य पक्ष यांच्यातील फरक हा मागे संघ असणे आणि संघासारखी संघटना नसणे यातील फरक आहे. सरसंघचालकांनी तो अधोरेखित केला…

एखादी संघटना जेव्हा शंभर वर्षे पूर्ण करून कात टाकण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिच्या अस्तित्वाचा अर्थ नव्याने लावणे गरजेचे. आणि ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल तर असे करणे अगत्याचेच. रा. स्व. संघ हे नाव उच्चारताच दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. एका टोकाला संघास जातीय, फॅसिस्ट ठरवणारे असतात आणि दुसर्‍या टोकास संघास शिरसावंद्य मानणारे स्वयंसेवक. या संघटनेचे तटस्थ मूल्यमापन या दोघांकडूनही अशक्य. पहिल्या गटातील टीकाकारांस संघाच्या अस्तित्वाचे रहस्य लक्षात येत नाही कारण या संघटनेची प्रत्येक बाब त्याज्य असा त्यांचा आविर्भाव असतो तर दुसर्‍या गटात केवळ भक्तिभावधारक असल्याने त्यांना विश्लेषणाची गरज नसते. या वातावरणात सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी संघाच्या शताब्दीनिमित्ताने चार महानगरांत विविध महाजनांशी प्रदीर्घ संवाद साधला. यातील चौथे सत्र मुंबईत झाले. उद्योजक, कलावंत यांच्यापासून ते भुरटे राजकारणी आणि माध्यमकर्मी यांच्यापर्यंत अनेकांनी या सत्रांत आपली उपस्थिती नोंदली जाईल याची दक्षता घेतली. या दोनदिवसीय सत्रांत सरसंघचालकांनी मांडलेल्या काही मुद्द्यांची दखल घ्यायला हवी.

पहिल्या सत्रात सरसंघचालकांनी संघाचा इतिहास सादर केला. त्यात उपस्थितांस उद्देशून त्यांनी ‘‘पूर्वी कधी तुम्ही संघाने बोलावले तरी येत नव्हतात’’ असे विधान केले. आता तुम्ही संघाच्या विचारधारेशी परिचित होऊ लागले आहात, तुम्हाला ती पटू लागली आहे म्हणून तुम्ही येथे आलात, असेही सरसंघचालक म्हणाले. यातील पहिले विधान तंतोतंत सत्य आणि दुसरे काहीसा सत्यापलाप. मराठीत ‘असतील शिते, तर जमतील भुते’ अशी म्हण आहे. तिचे येथे स्मरण होते. पूर्वी संघाने बोलवल्यावर फारसे कोणी प्रतिसाद देत नसत याचे साधे कारण म्हणजे त्यावेळी संघ-विचारांचा पुरस्कार करणारे सत्तेत नव्हते; हे आहे. आज संघ-विचार प्रेरित राजकीय पक्षाहाती सत्तेची ‘शिते’ असल्याने आणि ती सत्ता राबवणार्‍यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र असल्याने विविध क्षेत्रांतील ‘भुते’ संघाच्या हाकेसरशी धावून येतात. निमंत्रण नसले तरी मागून मागून घेतात. आपली हजेरी संघाच्या दरबारात लागणे आणि त्याहीपेक्षा ती लागली आहे असे इतरांस दिसणे हे आज अनेकांसाठी त्यामुळे महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या दहा वर्षांत अनेकांना आपले आजोबा, वडील इत्यादी वडीलधारे ‘शाखेत’ कसे जात होते याचा साक्षात्कार होऊ लागला. अशांच्या संख्यावाढीचा थेट संबंध केंद्रातील विद्यमान सरकारच्या ‘क्षमते’शी आहे. हे वास्तव लक्षात न येण्याइतके संघ नेतृत्व दूधखुळे अर्थातच नाही. सरसंघचालकांच्या टिप्पणीतून हीच बाब चतुरपणे समोर आली. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी सत्ताधारी भाजपबाबत केलेले सत्यकथनही तितकेच महत्त्वाचे ठरते. ‘‘संघाला अच्छे दिन भाजपमुळे आलेले नाहीत. वास्तव उलट आहे. भाजपला अच्छे दिन आले ते संघामुळे’’ अशा अर्थाचे विधान सरसंघचालकांनी केले. ते नाकारण्याची हिंमत आजमितीस कोणीही करणार नाही. भाजपचे माजी अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी तसा एकदा चोरटा प्रयत्न करून पाहिला. निवडणुकीच्या तोंडावर ‘‘भाजपस आता संघाच्या मदतीची गरज नाही’’, असे विधान त्यांनी केले आणि निवडणुकीत ‘चारसोपार’ची खात्री असलेल्या भाजपस स्वबळावर बहुमतही मिळाले नाही. त्यानंतर पळापळ झाली आणि इतकी वर्षे नागपूरला जाऊनही संघ मुख्यालयात न फिरकणारे ‘हेडगेवार स्मारका’समोर नतमस्तक होण्यास रांग लावू लागले. तेव्हा आजच्या भाजपच्या यशामागे संघ स्वयंसेवकांनी घेतलेले कष्ट आहेत हे नाकारणे भाजप नेतृत्वासाठी कृतघ्नपणाचे ठरेल. ती चूक आता त्या पक्षात कोणीही करू धजणार नाही. वास्तविक त्याहीवेळी नड्डा यांचा बोलविता धनी कोणी वेगळा असल्याची चर्चा होती. ती गैर नव्हती. कारण नड्डा यांची एकंदर राजकीय उंची आणि वजन लक्षात घेता ते असे टोकाचे विधान स्वत:च्या हिमतीवर करणे केवळ अशक्य. तेव्हा सरसंघचालकांनी ‘भाजपच्या अच्छे दिनामागे संघ स्वयंसेवक आहेत’ याची जाणीव करून दिली हे बरेच झाले. विचारधारेच्या डावीकडील सर्व पक्ष, काँग्रेस आणि भाजप यांच्यात हाच तर खरा फरक आहे. भाजपच्याही आधी स्थापन झालेल्या काँग्रेसकडे असे कार्यकर्त्यांचे जाळे तयार करणारे ‘सेवा दल’ होते. समाजवाद्यांच्या पाठीशी ‘राष्ट्र सेवा दल’ होते. इतकेच काय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाया ‘शाखेतील’ सक्रिय कार्यकर्ते आणि ‘स्थानीय लोकाधिकार समिती’च्या आधारे विविध आस्थापनांत स्थान निर्माण करणारे कार्यकर्ते हा होता. तो ढासळला. आता त्या पक्षांची अवस्था काय हे समजावून सांगण्याची गरज नाही. भाजप आणि अन्य पक्ष यांच्यातील फरक हा मागे संघ असणे आणि संघासारखी संघटना नसणे यातील फरक आहे. सरसंघचालकांनी तो अधोरेखित केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com