हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- यु-प्लस कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून आणि खोटी कागदपत्रे सादर करून भंडाऱ्यातील एका व्यापाऱ्याची ३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी बंगळुरू येथील एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नितेश परमानंद रामटेके (३८, रा. अशोकनगर/फुलमोगरा, भंडारा) असे फसवणूक झालेल्या फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे ‘रामटेके ट्रेडिंग कंपनी’ व ‘रामटेके वेईंग सर्व्हिसेस’ नावाने दुकान आहे. याप्रकरणी आरोपी मोहितकुमार त्यागी (रा. बंगळुरू) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑक्टोबर २०२५ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली. आरोपी मोहितकुमार त्यागी याने फिर्यादी नितेश रामटेके यांच्याशी संपर्क साधून आपण ‘यु प्लस’ (U Plus) कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचे सांगितले. त्याने रामटेके यांना कंपनीची फोर व्हिलर, टू व्हिलर बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि सोलर बॅटरीची डिलरशिप देण्याचे प्रलोभन दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने कंपनीची बनावट व खोटी कागदपत्रे दाखवली.
डिलरशिपच्या नावाखाली आरोपीने नितेश रामटेके यांना वेळोवेळी एकूण ३ लाख ५० हजार रुपये त्याने दिलेल्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त केले. पैसे भरूनही डिलरशिपबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने आणि आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे रामटेके यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी नितेश रामटेके यांनी भंडारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहितकुमार त्यागी विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (क) आणि (ड) अन्वये गुन्हा (अप. क्र. ०४/२०२६) नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा राजेंद्रप्रसाद तिवारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली करीत आहेत.








