नवी मुंबई :- महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांचा राष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकारातून महाबळेश्वर येथे B2B (Business to Business) फोकस्ड FAM (Familiarization) टूरचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राज्यातील पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाला विविध राज्यांतील टूर ऑपरेटर्स व पर्यटन तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशी माहिती कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र पर्यटन संचालनाल, स्थानिक हॉटेल असोसिएशन, टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाबळेश्वर येथे B2B फोकस्ड FAM (Familiarization) टूरचे आयोजन करण्यात आले होते. या टूरमध्ये महाबळेश्वर, गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली आणि कोल्हापूर या प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश होता. या प्रसंगी पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे तसेच सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी, पुणे गुणवंत पवार यांच्यासह विविध राज्यांतील टूर ऑपरेटर्स व पर्यटन तज्ज्ञ उपस्थित होते.
या उपक्रमात दिल्ली, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांमधून आलेल्या एकूण ३१ पर्यटन तज्ज्ञ व इन्फ्लुएन्सर्स यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभात महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवित वारली चित्रकला, हिमरू शाल व अन्य स्मृतिचिन्हे भेट देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक संघटनांनी सविस्तर सादरीकरण करून प्रत्येक स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, दर्जेदार हॉटेल सुविधा, स्थानिक खाद्यसंस्कृती, साहसी उपक्रम आणि विविध पर्यटन पॅकेजेस यांची माहिती दिली. या सादरीकरणामुळे प्रतिनिधींना महाराष्ट्रातील पर्यटन संधींची व्यापक माहिती मिळाली.
टूर दरम्यान प्रतिनिधींनी महाबळेश्वरच्या निसर्गरम्य डोंगररांगा, प्रसिद्ध स्ट्रॉबेरी मळे आणि विविध व्ह्यू पॉइंट्सना भेट देत निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. तसेच स्थानिक पर्यटन सेवा पुरवठादारांशी थेट संवाद साधण्यात आला.
सहभागी टूर ऑपरेटर्सनी अभिप्राय देताना नमूद केले की, महाराष्ट्रात निसर्ग, अध्यात्म, साहसी पर्यटन, समुद्रकिनारी पर्यटन आणि सांस्कृतिक वैविध्य यांचा उत्कृष्ट संगम आढळतो. स्वच्छता, पायाभूत सुविधा, प्रशासनाचे सहकार्य आणि स्थानिक नागरिकांचे आदरातिथ्य विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणी व कोल्हापुरी खाद्यसंस्कृती पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, महाराष्ट्र राज्य कौटुंबिक, धार्मिक, साहसी व निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक आणि संभाव्य गंतव्यस्थान असल्याचा सकारात्मक अभिप्राय नोंदविण्यात आला. भविष्यात विविध राज्यांत प्रभावी प्रचार-प्रसार करून अधिकाधिक पर्यटक महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी प्रतिनिधींनी दर्शविली.








