spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘उमेद’ अभियानांतर्गत वाशी येथील आयोजित राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनात ५.५० कोटींची उलाढाल

· ७० महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग, २६७ टन शेतमालाची थेट विक्री

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन कमालीचे यशस्वी ठरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या एकदिवसीय संमेलनात सुमारे ५.५० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली असून, महिला शेतकरी कंपन्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात ‘उमेद’ला उल्लेखनीय यश आले आहे.

या खरेदीदार-विक्रेता संमेलनामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील परस्पर खरेदी-विक्रीलाही मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. ‘उमेद’च्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याचे आश्वासक चित्र पाहायला मिळत आहे.

थेट बाजारपेठ आणि अधिक नफा

राज्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पिकवलेल्या मालाला मध्यस्थांशिवाय थेट बाजारपेठ मिळावी आणि महिला शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव व अधिक नफा मिळावा, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या व्यासपीठामुळे पहिल्यांदाच ७० महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नामांकित खरेदीदार समोरासमोर आले.

विक्रमी उलाढाल आणि मोठ्या खरेदीदारांचा सहभाग

दिवसभरात २६७ टन उत्पादनांच्या विक्रीतून २.१५ कोटी रुपयांची थेट उलाढाल झाली. तसेच, भविष्यातील खरेदीसाठी विविध संस्थांसोबत ३.३५ कोटी रुपयांचे हेतू पत्र स्वाक्षरित करण्यात आले. या संमेलनात सलाम किसान, स्टार अ‍ॅग्री, कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनी, प्राप्तीकृषी उद्योग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग यांसारख्या नामवंत संस्थांसह कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, प्रथमच प्रभागसंघ प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवत शेतकरी कंपन्यांशी थेट व्यवहार केले.

राज्यभरातील ३५ उत्पादनांची विक्री

या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील भौगोलिक मानांकन प्राप्त आणि वैशिष्ट्यपूर्ण ३५ उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. यामध्ये प्रामुख्याने: कोकणातून काजू, कोकम, मॅंगो पल्प आणि नाचणी हा शेतमाल होता. पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचा इंद्रायणी तांदूळ, जुन्नरची द्राक्षे-कांदा, सोलापूरची मालदांडी ज्वारी आणि कोल्हापूरचा गुळ व मिरची या प्रकारचा शेतमाल होता. विदर्भ व मराठवाड्यातून वर्ध्याची वायगाव हळद, नागपूरची भिवापुरी मिरची, लातूरची पांढरी तूरडाळ, नांदेडची अर्धापूर हळद आणि भंडारा-गडचिरोलीचा चिनूर व कालीमुछ तांदूळ असा शेतमाल ग्रामीण महिलांनी उपलब्ध करून दिला होता.

संमेलनाचे उद्घाटन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले. उपस्थितांना सागर आणि अभियानाचे अतिरिक्त संचालक निखिलकुमार ओसवाल यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक संदीप जठार यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.