नागपूर :- प्रवीण कावळे व मित्र परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे पं. श्रीधर पार्सेकर व पं. विष्णुपंत कावळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ संगीत समारोहाचे आयोजन रविवार दि. ८ मार्च रोजी, सायंकाळी ५ वाजता. श्रीगुरुदेव सेवाश्रम, सुभाष रोड, नागपूर येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात व्हायोलिन वादक प्रवीण कावळे यांच्या शिष्यगणांच्या समूह व्हायोलिन वादनाने व नंतर प्रवीण कावळे यांच्या एकल वादनाने होईल. तद्नंतर नागपूर नगरीचे गायक पं. अनिरुद्ध देशपांडे शास्त्रीय गायनाने आपली कला सादर करतील. ऑस्टिन (यूएसए) येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्हायोलिन वादक पं. इंद्रदीप घोष आपले व्हायोलिन वादन सादर करून कार्यक्रमाचा शेवट करतील. पं.गुणवंत घटवाई यांची संवादिनीवर, वेद ढोक, अथर्व शेष व मोहन कुर्वे यांची तबल्यावर साथसंगत लाभणार आहे. श्रीमती. अंजली पारनंदीवार यांच्या निवेदनाने कार्यक्रम पार पडणार आहे. प्रवीण कावळे यांनी सर्व संगीत रसिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून समारोहाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.








