spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 कला-क्रीडा उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो – जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर

यासीन शेख, गोंदिया :- जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय दिव्यांग कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२६ हा कार्यक्रम जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कुडवा, ता. व जि. गोंदिया येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव चे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कला सादरीकरणे तसेच क्रीडा स्पर्धांमधून आपल्या कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन केले. जिल्ह्यातील विविध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला असून त्यांच्या सादरीकरणातून आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक उर्जा स्पष्टपणे जाणवत होती.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, चित्रकला, विविध सांस्कृतिक सादरीकरणे तसेच क्रीडा स्पर्धांमधून आपली प्रतिभा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी हे कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. त्यांच्या अंगी अपार क्षमता, जिद्द आणि चिकाटी दडलेली असते. योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थी समाजात नवे आदर्श निर्माण करू शकतात. दिव्यांगत्व ही अडचण नसून ती त्यांच्या जीवनातील एक वेगळी परिस्थिती आहे; मात्र त्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे महोत्सव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. दिव्यांग विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची हीन भावना न बाळगता आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवून पुढे जावे आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भेंडारकर यांनी पालक आणि शिक्षकांनाही विशेष आवाहन करताना सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक, शिक्षक आणि प्रशासन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देणे, त्यांची क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने पुढे येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते आणि समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्ष, अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, पशुसंवर्धन व कृषी सभापती दिपा चंद्रिकापुरे, पंचायत समिती गोंदिया सभापती मुनेश रहांगडाले, पंचायत समिती सडक/अर्जुनी सभापती चेतन वडगाये, जि.प. सदस्य पूजा शेठ, छबु उके, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम, सरपंच बाळकृष्ण पटले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमलनाथ फरदे, उपाध्यक्ष सुमेध जगणित, गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम, अहमद मनिहार, विस्तार अधिकारी नंदकुमार उहाके, केंद्रप्रमुख बि. डी. डोंगरे, मंजुलता वैष्णव यांच्यासह इतर मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन शाळा प्रशासन तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवाला प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.

Popular Articles