-कामठीत गांजा,एम डी विक्री जोमात
– कामठी शहरातील बहुतांश तरुणाई गांजा व एम डी च्या विळख्यात
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे महाराष्टाच्या गॅझेट मध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद करण्यात आली आहे तेव्हा कामठी शहरात गुन्हेगारीवर अंकुश लादून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या मुख्य उद्देशातून कामठी पोलीस स्टेशन नागपूर परिमंडळच्या पाचव्या झोन मध्ये निर्माण करीत शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करीत 2014 मध्ये मोठया गाजावाजाने शुभारंभ करण्यात आला असला तरी गुन्हेगारीचा ग्राफ पाहिजे तेवढा कमी झालेला दिसत नाही.दबंग म्हणून गाजलेले तत्कालीन सी पी अमितेशकुमार व तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांच्या नावाने गुंडप्रवृत्तीच्या नागरिकांत चांगलीच दहशत माजली होती. अवैध व्यवसायिकांनी इतरत्र आपले बस्तान मांडले होते तसेच तत्कालीन डीसीपी अविनाशकुमार मुळे अवैध व्यवसायिकात एक मोठी दहशत निर्माण झाली होती मात्र काही वसुली बहाद्दूर पोलीस कर्मचारी आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीतून अजूनही बाहेर पडले नाहोत ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कामठी शहरात आजही चोरीछुप्या पद्धतीने अवैध धंदे बेभान सुरु असून अमली पदार्थाची बिनभोबाटपणे तस्करी सुरु आहे तर मागील दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या अटकेत करण्यात आलेल्या कोकेंनतस्करकडून कामठी हे कोकेन व गर्द चे मोठे तस्कर असल्याचे कळले होते तसेच कामठी शहरात गांजा,एम डी व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून बिनधास्त पणे गांजा विक्री सह एम डी विक्री सुरू आहे .कामठी हद्दीतील भागात गांजा व एम डी,ड्रग्स सारख्या अंमली पदार्थची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने 16 ते 21 वर्षे वयोगटातील युवकाना अंमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने परिसरातील युवक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न केव्हाही निर्माण होऊ शकतो तेव्हा आजची तरुणाई या अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन त्याचे भविष्य उध्वस्त होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने या अंमली पदार्थ संबंधित आरोपिवर गुन्हे दाखल करून गुन्हेगारीवर अंकुश साधावा अशी मागणी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.
आज कामठी शहरातील गल्लीबोळात गांजा तसेच एम डी विक्री मोठ्या प्रमाणात होत असून येथील मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्रातील बहुतांश तरुणाई ही गांजाच्या तसेच एम डी च्या विळख्यात अडकलेली आहे .तर ही तरुणाई गांजा तसेच एम डी विक्रीत सहभागी होत असून खुद्द या व्यसनाच्या आहारी गेल्याने या तरुणाईचे भविष्य धोक्यात आले आहे या परिस्थितीत येथील पोलिसांनी या गांजा तसेच एम डी तस्करीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून योग्य ती कारवाही करून येथील तरुणाईचे धोक्यात असलेले भविष्य धोक्याबाहेर आणण्याची जवाबदारी बजवावी अशी मागणी येथील जागरूक नागरिकच्या वतीने सुरेश भोयर यांनी केली आहे.








