spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान लवकरच जमा होणार – मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

मुंबई :- विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या विलीनीकरणामुळे तांत्रिक अडचणीत सापडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान लवकरच त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.

मंगळवेढा मतदारसंघातील घरकुलाना निधी वितरित न होणे, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू न मिळणे, जागेचे प्रलंबित प्रस्ताव आणि मनरेगाच्या थकीत मजुरीबाबतही आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, बँक विलीनीकरणामुळे आयएफएससी (IFSC) कोड बदलल्याने पेमेंट प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. सध्या नवीन खाती अपडेट करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांचे पैसे डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. एकाही लाभार्थ्याचे पेमेंट थांबणार नाही, ही शासनाची ठाम भूमिका आहे.

घरकुलासाठी ५ ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत दीड लाख लोकांनी याचा लाभ घेतला आहे. ज्यांना अद्याप वाळू मिळाली नाही, त्यांना ती उपलब्ध करून दिली जाईल, मात्र वाळूऐवजी रोख रक्कम देणे शक्य नाही. भूमिहीन लाभार्थी ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, अशा लाभार्थ्यांना शासन जमीन उपलब्ध करून देईल किंवा जमीन खरेदीसाठी अर्थसाह्य करेल. प्रलंबित प्रस्तावांबाबत माहिती दिल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. मनरेगा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे रखडलेली मनरेगाची मजुरी लाभार्थ्यांना लवकर मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही गोरे यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत बिधनसभा सदस्य श्वेता महाले,राजेश पवार,सत्यजीत देशमुख यांनी प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला.

Popular Articles