– कर्करोग लसीकरणासाठी मनपा शाळेसह खाजगी शाळामध्येही जनजागृती करणार
नागपूर :- शहरातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना देण्यात येणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सोमवार (ता. ९) जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते झाला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याने मनपाच्या शाळांसोबतच खासगी शाळांमध्येही या लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, नगरसेविका कुमुदिनी गुडधे पाटील, नगरसेवक अडव्होकेट डॉ. शैलेंद्र डोरले, मनपाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल काबंळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेकानंद मठपती, जयताळा यु.पी.एच.सी, मनपा जयताळा माध्यमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मंजुषा सातपुते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पॉल, आरोग्य वर्धिनी केंद्र, धनवंतरी यू,एच,डब्लू,सी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरांजली गजभिये,आरोग्य वर्धिनी केंद्र, रेणूका माता, यू, एच, डब्लू, सी, मा.एन.यु एच,एम चे शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. राजेश बुरे, मा.पी.एच.एन.- अर्चना खाडे, दिपाली नागरे, दिपाली गणोरकर, ज्योती मानकर,प्रफुल्ल किन्हीकर, अश्विनी गायकवाड, एम.एस.यू चे सवांद तज्ज्ञ स्नेहल करंजेकर, पी.एच.एम डॉ. चैताली हटवार, क्षेत्र लसीकरण नियंत्रण सोनल सियाग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, त्यावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मनपाच्या शाळांसोबतच खाजगी शाळांमध्येही या लसीकरण मोहिमेबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलींना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व शिक्षकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या लसीकरणाबाबत काही ठिकाणी अपप्रचार होत असल्याचे निदर्शनास आले असून, ही लस सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतरच देण्यात येत आहे, आणि ती सुरक्षित आहे असेही महापौरांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच जनजागृती करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना प्रोत्साहन देण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींच्या पालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी प्राधान्याने काम करावे असे त्यांनी निर्देश दिले.
आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी यावेळी सांगितले की, लसीकरण मोहिमेसाठी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे तसेच लसीबाबत कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच मा. अतिरिक्त आयुक्त श्रीमती. वसुमना पंत यांनी या मोहिमेसाठी लसीकरणाची ‘लाईन लिस्ट’ तयार करण्यात आली असून त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे, असे मत व्यक्त केले. तसेच टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व युपीएचसी केंद्रांवर ही लस उपलब्ध करून दिलेली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पी.एच.एन. अर्चना खाडे, अश्विनी गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश भुरे यांनी मानले. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन पात्र मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.