spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महिला शेतकरी गटांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्याची संधी !

Ø 24 लाखांपर्यंत अनुदान

Ø 5 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे

Ø जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

यवतमाळ :- महाराष्ट्र शासनाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असून यात यवतमाळ जिल्ह्यातील 559 गावे समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर कृषि यांत्रिकीकरणाला चालना देणे आवश्यक असून, सर्व शेतकऱ्यांना यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसल्याने गावस्तरावर नोंदणीकृत महिला बचत गटांमार्फत “गावस्तरावरील कृषि अवजारे बँक” स्थापन करण्यासाठी 5 एप्रिलपर्यत अर्ज मागविण्यात आले आहेत.

तसेच ही बँक स्थापन करून अनुदानित यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व अचूक शेतीकाम करून उत्पादकता व नफा वाढविता येणार आहे. त्याकरिता प्रकल्प गावांमध्ये “एक गाव, एक कृषी औजारे बँक” या तत्त्वानुसार कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि खर्च कमी करणे हा आहे.

या घटकाकरिता प्रकल्प गावातील उमेद व माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या योजनेसाठी पात्र राहतील. अर्ज करण्यासाठी इच्छुक महिला गटांनी एफपीओ-डीबीटी पोर्टलच्या https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ या संकेतस्थळावर 5 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.

एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, जिल्हा स्तरावर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल. अर्जदार महिला बचत गटांमध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 महिला सदस्य असणे आवश्यक आहे. कृषि अवजारे बँकांसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अनुदान देय राहील आणि अनुदानाची कमाल मर्यादा रक्कम 24 लाख इतकी राहील. ज्या गटांना यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेसाठी लाभ देण्यात आला आहे, असे गट या घटकांतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.