नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता १०) रोजी भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्र आणि सुसबिडी (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट) (SusBDe)) कंपनीच्या नवीन कचऱ्यावर प्रक्रिया करून आरडीएफ, बायो सीएनजी आणि सेंद्रिय खत तयार करणाऱ्या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी महापौर निता ठाकरे यांनी विहित कालावधीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासह कचर्याचे ढिगारे कमी करून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यांनी सुसबिडी कंपांनीच्या व्यवस्थापन प्रतींनिधींना लवकरात लवकर उरलेल्या मशीनरी लावणायचे ही निर्देश दिले. तसेच सुसबिडी चा बायोगॅस प्रकल्पाचे वेळेवर आधारित कार्यक्रम(टाईमबॉंड प्रोग्राम) सादर करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सल्लागार राजेंद्र जगताप, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे विजय टिळेकर, पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित, कमलेश सिंह, संकेत जाधव, मनपाचे प्रशांत वाघमारे, स्वच्छता अधिकारी रोहिदास राठोड यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते. महापौरांनी व आयुक्तांनी सुसबिडी प्रकल्पाला भेट देत माहिती जाणून घेतली.

शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. सध्या सुसबिडीच्या मध्यामातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या नव्याने कचऱ्याचे ढिगारा निर्माण होणार नाही, आणि जुन्या कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे. याप्रसंगी महापौर आणि मनपा आयुक्त यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करीत प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेतली. संपूर्ण परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात यावा, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच या घनकचरा प्रक्रिया केंद्राचे बहुतांश कार्य पूर्ण झाले असून, उर्वरित कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या निर्देश दिले.
पुणे येथील भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीला येत्या पाच वर्षांत करारबद्ध करण्यात आले आहे.




