spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा-गोंदियातील धान खरेदीच्या मुद्द्यावर डॉ. प्रशांत पडोळे आक्रमक; संसदेत पुकारले आंदोलन”

हंसराज प्रतिनिधी भंडारा, नवी दिल्ली :-  “जोपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाचा शेवटचा दाणा खरेदी केला जात नाही, तोपर्यंत सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे,” अशी आग्रही मागणी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी नवी दिल्ली येथे संसद परिसरात आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

शेतकरी अडचणीत, सरकारचे केवळ ‘कागदी’ दावे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शासकीय केंद्रांवर धान खरेदी केली जाते. मात्र, सध्या दिलेले उद्दिष्ट संपल्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिले आहेत. डॉ. पडोळे म्हणाले की, “आज भंडारा जिल्ह्यात तब्बल ३० लाख क्विंटल आणि गोंदिया जिल्ह्यात १५ लाख क्विंटल धान केंद्रांवर पडून आहे. सरकार उद्दिष्ट वाढवल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात खरेदी होत नाही. सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.”

शासकीय केंद्रांवर उद्दिष्ट नसल्याने शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागते. वर्षभराचा खर्च आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसतो. शेवटी नाईलाजास्तव शेतकरी हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना धान विकतो. “सरकारकडून पैसे मिळायला उशीर होतो, म्हणून शेतकरी कमी पैशात व्यापाऱ्यांकडे जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होत नाही,” अशी खंत डॉ. पडोळे यांनी व्यक्त केली.

या गंभीर विषयावर डॉ. प्रशांत पडोळे यांनी यापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळेच त्यांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रमुख मागण्या:

🔹 दोन्ही जिल्ह्यातील संपूर्ण धान खरेदी होईल एवढे वाढीव उद्दिष्ट तातडीने द्यावे.

🔹 धान खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे विनाविलंब खात्यात जमा करावेत.

🔹 शेतकऱ्यांना मिळणारा बोनस आणि भाव यामध्ये वाढ करावी.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष जमिनीवर धान खरेदी सुरू करावी, असा इशाराही डॉ. पडोळे यांनी यावेळी दिला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.