मुंबई :- कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजना राबविली जाते. या अंतर्गत सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ॲग्रीस्टॅकअंतर्गत बोगस आयडी देण्यात आल्याची कोणतीही तक्रार नाही. तथापि असे निदर्शनास आल्यास त्याबाबत चौकशी करुन सामूहिक सुविधा केंद्रावर कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य करण देवतळे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार, नमिता मुंदडा यांनी सहभाग घेतला.
कृषीमंत्री भरणे म्हणाले, फार्मर आयडीबाबतची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. राज्यात ४ मार्च २०२६ पर्यंत एक कोटी ३१ लाख ८२ हजार आयडी देण्यात आले आहेत. देशातील इतक्या मोठ्या संख्येने आयडी देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.



