spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आंबेडकरी चळवळीच्या यशामागे महिलांचा मोठा वाटा – ज. वि. पवार

– नेरमध्ये दुसरे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन

यवतमाळ :- आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा राहिला असून, ज्या चळवळीत महिलांचा सहभाग असतो तीच चळवळ यशस्वी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार यांनी केले. ते नेर येथे आयोजित दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रेखा मेश्राम ह्या होत्या. स्वागताध्यक्ष इंदिरा तलवारे, प्रमुख अतिथी म्हणून पपिता पाटील, वक्ते सुषमा पाखरे, डॉ. किर्ताराज लोणारे, प्रमुख पाहुणे पत्रकार राहुल वासनिक, वंदना किटके आदि उपस्थित होते. यावेळी अमेरीकेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रेव्हरी अवार्ड प्राप्त कांता अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला पाहुण्यांना समता सैनिक दला तर्फे सलामी देण्यात आली.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ज. वि. पवार यांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई तसेच प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रेखा मेश्राम, स्वागताध्यक्षा इंदिरा तलवारे, मुख्य निमंत्रक वनिता मोरे, मुख्य संयोजक डॉ. शरद मोरे यांचेही त्यांनी उल्लेख केला.

पवार पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यातून १९४० च्या दशकात शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष उदयास आला. या पक्षाचे पहिले अधिवेशन १८ आणि १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथील मोहन पार्क मैदानावर झाले होते. या अधिवेशनात महिलांचे स्वतंत्र अधिवेशनही झाले होते. अध्यक्षस्थान सुलोचना डोंगरे यांनी भूषविले होते. त्या अधिवेशनात तब्बल पंचवीस हजार महिलांनी सहभाग घेत चळवळीचे महत्त्व स्पष्ट केले होते. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, “ज्या चळवळीत महिलांचा सहभाग असतो ती चळवळ यशस्वी ठरते.” आंबेडकरी चळवळीचा इतिहास पाहिला असता हे स्पष्ट दिसून येते की, गेल्या अनेक दशकांत चळवळीने जे यश मिळवले त्यामागे महिलांचे मोठे योगदान आहे.

पवार यांनी सांगितले की, १९२७ मध्ये बाबासाहेबांनी जनआंदोलनाची सुरुवात केली तेव्हा महिला चळवळ अगदी बाल्यावस्थेत होती. महिलांनी कसा पेहराव करावा, कोणते दागिने वापरावेत याचे मार्गदर्शनही त्या काळात बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडून दिले जात होते. मात्र कालांतराने ही चळवळ एवढी सक्षम झाली की महिलांनी देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत मजल मारली. एखादी महिला देशाची पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास हा बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाच्या विचारांमधूनच घडला, असे त्यांनी नमूद केले.

इतिहासात बुद्धकालीन समाजात महिलांना मोठा सन्मान होता. अनेक विदुषी त्या काळात प्रसिद्ध होत्या. मात्र नंतरच्या काळात धर्मग्रंथांच्या नावाखाली महिलांवर अनेक अन्यायकारक बंधने लादण्यात आली. पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्यासारख्या अमानुष प्रथा प्रचलित होत्या. स्त्रीला परक्याचे धन किंवा पापाचे मूळ मानणारी मानसिकता समाजात रुजवण्यात आली. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा देत त्यांना शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग दाखविला, असेही पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालन वनिता मोरे व महादेव घरडे, प्रास्ताविक प्रा. जगदीश पाटील यांनी केले. आभार राजेश पाटील यांनी मानले. या संमेलनाचे डॉ. शरद मोरे हे मुख्य संयोजक आहे. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला उपस्थित होत्या.

यावेळी साप्ताहिक वज्जीसंदेशचा संमेलन विशेषाक उद्घाटकीय व अध्यक्षीय भाषणांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदेश पाटील, वृषभ मेश्राम, जोशना खडसे, रेखा इंगोले, पपीता पाटील, यांनी परिश्रम घेतले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनात विविध क्षेत्रात कार्यकरणा-यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य योगिता चिंचोळे, प्रा. डॉ. विक्रांत मेश्राम, डॉ. प्रा. सुजाता वानखेडे, डॉ. पूजा गायकवाड, डॉ. किरण गायकवाड, डॉ. स्मिता चौधरी, पल्लवी मेश्राम, दिशा घरडे, चारु नन्नावरे, महादेव घरडे यांचा सन्मान करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.