– वैभव सांगळे यांच्या चित्रप्रदर्शनातील अनुभव
कला ही केवळ रंगांची किंवा रेषांची मांडणी नसते; ती कलाकाराच्या मनातील भावविश्वाची सजीव अभिव्यक्ती असते. नुकतेच भारतीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या प्रयोजक तत्वाखाली सिडको अर्बन हाट सीबीडी बेलापूर येथे दि. 06 मार्च ते दि. 15 मार्च 2026 या कालावधीत “नॅशनल गांधी शिल्प बाजार” या महोत्सवाचे आयोजित करण्याता आले आहे. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यामुळे मला या महोत्सवाला जाण्याचा योग आला येथील स्टॉल क्र. 03 मधील चित्रप्रदर्शनाला भेट दिली असता, या प्रदर्शनात अकोल्याचे सुपुत्र, दिव्यांग चित्रकार वैभव तानाजी सांगळे यांच्या चित्रांनी मन अक्षरशः मोहित करून टाकले. त्यांच्या चित्रांमध्ये उमटलेले जिवंत भाव, रंगांची सूक्ष्म मांडणी आणि जीवनाचे वास्तवदर्शी दर्शन पाहताना मन क्षणभर त्या रंगांच्या विश्वात हरवून गेले.
जन्मतः कर्णबधिर असतानाही अथक जिद्द, चिकाटी आणि कलेवरील नितांत प्रेम यांच्या जोरावर वैभव सांगळे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रदर्शनात मांडलेली त्यांची चित्रे पाहताना प्रत्येक रंगरेषा ही त्यांच्या संघर्षमय प्रवासाची साक्ष देत असल्याची जाणीव होत होती. त्यांच्या चित्रांमध्ये केवळ सौंदर्य नाही, तर भावनांची आणि अनुभवांची एक समृद्ध दुनिया सामावलेली आहे.

वैभवचा जीवनप्रवास हा संघर्षातून उभा राहिलेल्या जिद्दीचा प्रेरणादायी अध्याय आहे. जन्मतः ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या या कलाकाराने आपल्या आई-वडिलांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्वतःच्या कष्टाच्या जोरावर संवादाची दारे उघडली. वयाच्या चौथ्या वर्षी त्याला श्रवणयंत्र देण्यात आले आणि स्पीच थेरपीच्या माध्यमातून त्याला बोलण्याचा सराव करून घेण्यात आला. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी स्वतः स्पीच थेरपी शिकून मुलाच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. याच काळात त्याच्या हातात पेन्सिल आणि रंगांचा ब्रश देऊन चित्रकलेची आवड निर्माण करण्यात आली. त्या छोट्या हातांनी काढलेल्या रेषांनी पुढे एक विलक्षण कलायात्रा आकार घेतली. शालेय जीवनात अनेक अडचणी आणि टिंगलटवाळी सहन करतही वैभवने आपला आत्मविश्वास कायम ठेवला. त्याच्या वडिलांनी त्याला भाषणे लिहून दिली, लोकांसमोर उभे राहण्याचा सराव करून घेतला आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्याची ताकद दिली.
वैभवच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आठवीत असताना घडला. कानाच्या तपासणीसाठी मुंबईला गेल्यावर त्याचे वडील त्याला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या प्रतिष्ठित कला संस्थेत घेऊन गेले. त्या संस्थेचे दर्शन होताच वैभवच्या मनात कलेचे स्वप्न रुजले. वडिलांनी त्याला सांगितले की, येथे प्रवेश मिळाला तर आयुष्य उजळून जाईल. त्या शब्दांनी प्रेरित होऊन त्याने त्या संस्थेत शिक्षण घेण्याचा निर्धार केला.
पुढे दहावी आणि बारावीमध्ये उत्तम यश संपादन करून चित्रकलेच्या सीईटी परीक्षेत दिव्यांग गटातून प्रथम क्रमांक मिळवत त्याने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथे प्रवेश मिळवला. तेथून त्याने बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) ही पदवी संपादन केली. इंद्रायणी मतिमंद शाळेपासून ते जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सपर्यंतचा त्याचा प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास आहे.
प्रदर्शनात पाहताना त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवत होती. पोर्ट्रेट्समधील जिवंत भाव, निसर्गचित्रांतील शांतता, ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण, वारली शैलीतील सर्जनशीलता आणि पेन्सिल पोर्ट्रेटमधील सूक्ष्म रेखाटन – या सर्वांनी मनाला भुरळ घातली. प्रत्येक चित्रात कलाकाराच्या भावविश्वाची खोल जाण आणि जीवनाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी स्पष्टपणे जाणवते.
आज वैभवच्या कलेने देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, रशिया आणि फ्रान्स या देशांमध्ये त्याच्या चित्रांनी स्थान मिळवले आहे. मुंबईतील अमेरिकन दूतावासातही त्याच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या ‘दिव्य कला मेला’ या राष्ट्रीय प्रदर्शनातही त्याने सहभाग नोंदवला असून दिल्ली, मुंबई, भोपाळ, गोहाटी, जयपूर, इंदूर, वाराणसी आणि बेंगळुरू अशा अनेक शहरांत त्याच्या कलाकृतींनी रसिकांचे लक्ष वेधले आहे. वैभव यांना नुकत्याच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिल्ली येथील विज्ञान भवनात “राष्ट्रीय दिव्यांगजन” या पुरस्काराने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
वैभवच्या यशामागे त्याच्या कुटुंबाची अमूल्य साथ आहे. आई-वडिलांचे अथक प्रयत्न, भावाचे मार्गदर्शन, गुरुजनांचे आशीर्वाद आणि मित्रपरिवाराचे प्रोत्साहन यामुळेच ही यशोगाथा घडली आहे. त्याच्या नम्र स्वभावातून आणि कलेतील प्रामाणिकतेतून ही जाणीव स्पष्टपणे दिसून येते.
या प्रदर्शनातून बाहेर पडताना मनात एकच विचार घोळत राहिला—कलेला कोणत्याही मर्यादा नसतात. शरीराला मर्यादा असू शकतात, परंतु प्रतिभेला आणि स्वप्नांना सीमा नसते. वैभव सांगळे यांच्या चित्रांनी केवळ कॅनव्हास रंगवले नाहीत; त्यांनी रसिकांच्या मनातही प्रेरणेचे रंग कायमचे उमटवले आहेत.
म्हणूनच ठामपणे म्हणावेसे वाटते की—या दिव्यांग चित्रकाराच्या प्रतिभेने रंगांना शब्द दिले आणि संघर्षाला सौंदर्याची एक अद्भुत अभिव्यक्ती दिली. तेव्हा आपणही 06 मार्च, ते 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाट या भव्य प्रदर्शनाला नक्की भेट द्या.
-वैभव सांगळे




