spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पेंढरी शिवरात रानगव्याच्या हल्ल्यात एक महिला मृत्यूमुखी तर एक तरुणी गंभीर जखमी

– बालकांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरविले

– जंगली जनावरांचा बंदोबस्त करा नागरिकांची मागणी

– संतप्त नागरिकांचा खापा वन विभागाला घेराव

खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील पेंढरी शिवारात रानगव्याच्या हल्ल्यात एक महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना दुपारी दीड वाजताच्या सुमारास दि. ११ मार्च बुधवारला घडली.

रेशमा विकेश धुर्वे वय २९ वर्ष रा. पेंढरी, ता. सावनेर असे मृतक महिलेचे नाव असून एक चार वर्षाची मुलगी, एक दोन वर्षाचा मुलगा आहे. दोन्ही मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरविले. तसेच निशा केशव इवनाती वय १६ वर्ष, रा. बोरिया, बिछावा जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश हल्ली मुक्काम पेंढरी असे गंभीर जखमी तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पेंढरी शिवारातील कल्लू कनोजे यांच्या शेतात कापूस वेचण्याकरिता रेशमा आणि निशा गेली होती. यादरम्यान दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक रानगव्याने महिलेवर हल्ला चढवला त्यातच त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नात निशालाही रानगव्याने गंभीर जखमी केले. ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती गावकऱ्यांनी त्वरित वन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन अधिकारी महेश कुथे घटनास्थळी दाखल झाले.

वन्य प्राण्यांच्या या वाढत्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिक अधिक संतप्त झाले. त्यातूनच वन विभाग कर्मचारी व गावकरी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर खापा पोलीस ठाणेदार किशोर भुजाडे आपल्या चमूसह त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे घटनास्थळी झाले आणि परिस्थिती आटोक्यात आणून संतप्त जमावाला शांत केले.

खापा आर एफ ओ विजय गंगावणे यांनी सदर मृतक महिलेच्या कुटुंबाला शासनातर्फे २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल असे आश्वासन देऊन संतप्त जमावाला शांत केले. जखमी तरुणीचे उपचार सुरळीतपणे करण्यात येईल असेही आश्वासन दिले. गावातील संतप्त नागरिकांनी खापा वन विभाग कार्यालय येथे येऊन घेराव केला. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई आर एफ ओ विजय गंगावणे यांच्या मार्गदर्शनात, महेश कुथे व वनरक्षक करीत आहे.

सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह शासकीय रुग्णालय सावनेर येथे विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तर जखमीला शासकीय रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले.

दिवसेंदिवस जंगली जनावरांचे वाढत असलेले हल्ले यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने जंगली जनावरांचा बंदोबस्त करून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व पेंढरी गावातील नागरिकांनी सुरक्षित करावे अशी मागणी करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.