spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावधान! उघड्यावर कचरा टाकल्यास थेट कारवाई; ‘आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात’ फलकांद्वारे कामठी नगर परिषदेचा इशारा

कामठी :- शहरात स्वच्छता राखण्यासाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्र. ४ मध्ये आज “सावधान! आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहात” असे इशारा देणाऱ्या फलकाचे उद्घाटन नगराध्यक्ष अजय अग्रवाल, गटनेते काशीनाथ प्रधान आणि नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी असे फलक टप्प्याटप्प्याने लावण्यात येत असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर सीसीटीव्हीद्वारे बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी कामठी घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो फक्त नगर परिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. तसेच रस्ते, चौक, नाल्यांच्या कडेला किंवा मोकळ्या जागांवर कचरा टाकणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

“स्वच्छ कामठी, सुंदर कामठी” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून नगर परिषदेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अजय अग्रवाल, गटनेते काशीनाथ प्रधान, नगरसेवक अनिल सूर्यवंशी तसेच स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले.

Popular Articles