– भंडारबोडी-शिवणी परीसरातील दोन हजार हेक्टर शेती कालव्याअभावी तहानलेल्याच
– कालवा निर्मितीसाठी ७५ कोटी रुपये मंजुर
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तुमसर-रामटेक मार्गावर असलेल्या भंडारबोडी-शिवणी शेतशिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या जवळपास दोन हजार हेक्टर शेती कालव्याअभावी गेल्या कित्येक वर्षांपासून अद्यापही तहानलेल्याच आहेत. पाण्याअभावी शेती शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी असा प्रश्न उपस्थित करीत या भागात पेंच जलाशयातुन अथवा खिंडसी जलाशयातून कालव्याची निर्मिती करावी अशी मागणी भंडारबोडी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य तथा माजी सरपंच महेंद्र दिवटे यांनी केलेली आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात हे तेवढेच खरे असले तरी मात्र रामटेक तालुक्यातील शिवणी-भंडारबोडी शेतशिवारात गरज असतांनाही एका कालव्याचीही निर्मिती करण्यात न येणे ही या परिसरातील शेतकऱ्यांसाठी दुर्भाग्याचीच बाब म्हणावी लागेल. या भागात ज्या बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर – मोटार पंप तथा बोअर ची व्यवस्था आहे. इतर शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. अशा शेतकऱ्यांनी शेती करावी तरी कशी असा प्रश्न दिवटे यांनी उपस्थित केलेला आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी महेंद्र दिवटे तथा येथिल काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या भागात कालव्याची निर्मिती व्हावी यासाठी मोठा संघर्ष केला. त्यासंबंधी जलसिंचन मंत्र्यांना निवेदन देवुन मागणी सुद्धा केली होती. तेव्हा जलसिंचन विभागाकडुन या भागात कालवा निर्मितीसाठी ७५ कोटी रुपये मंजुरही केले होते मात्र पुढे हे काम थंडबस्त्यात पडले असल्याचेही महेंद्र दिवटे यांनी संताप व्यक्त करीत सांगितले. आतातर येथे स्वतः मंत्रीमहोदय बसलेले आहे तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे असे मत दिवटे यांनी व्यक्त केलेले आहे.
कालव्यावर रुंद पुलाची निर्मिती करा
सालईमेटा गावाजवळील शेतीभागातुन एक कालवा गेलेला आहे. कालव्याच्या पलीकडे जवळपास शंभर हेक्टर शेती आहे. या कालव्यावर अरुंद पुल असल्याने त्यावरून बंडी तथा ट्रॅक्टर जात नाही. परिणामस्वरूप कास्तकारांना त्यांच्या शेतामध्ये शेतपयोगी साहित्य या पुलावरून कमी वेळेत नेता येत नाही. त्यांना जवळपास एक ते दिड किलोमिटर चा फेरा मारून दुसऱ्या मार्गाने फेऱ्याने जावे लागते. कास्तकारांची जवळपास २५ वर्षापासुन मंत्रीमहोदयांना यासंबंधी मागणी आहे मात्र अद्यापही हे प्रकरण दुलक्षीतच आहे. तेव्हा या भागातील शेतकऱ्यांचा कुणी वाली नाही का असा केविलवाना प्रश्न महेंद्र दिवटे यांचेसह या परीसरातील शेतकऱ्यांनी केलेला आहे.




