एम्स नागपूर येथे महिला किडनी दात्यांचा सन्मान

0
52

– आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन संपन्न 

नागपूर :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 10 मार्च रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांना नवे जीवन देण्यासाठी निःस्वार्थ भावनेने किडनी दान केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून या महिला दात्यांनी दाखविलेल्या त्याग, करुणा आणि धैर्याच्या भावनेचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला संबोधित करतांना एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी अंगदानाद्वारे जीव वाचविण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी माहिती दिली की आतापर्यंत एम्स नागपूर येथे एकूण 55 रीनल ट्रान्सप्लांट करण्यात आले असून, 21 लाईव्ह रीनल ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करण्यात आले आहेत. त्यापैकी 15 दाते महिला तर 6 पुरुष आहेत, जे कुटुंबामध्ये अंग प्रत्यारोपणासाठी महिलांचे मोठे योगदान दर्शवितात. त्यांनी पुढे सांगितले की हे आकडे समाजातील महिलांची ताकद आणि त्याग दर्शवतात, मात्र या लिंग असंतुलनाला कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची समान सहभागिता आवश्यक आहे. कार्यक्रमा दरम्यान किडनी दाते सुषमा चहारे यांनी आपला अनुभव व्यक्त केला. त्यांनी एम्स नागपूरमध्ये मिळालेल्या उपचार व सेवांबद्दल समाधान व्यक्त केले आणि रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले. यापूर्वी डॉ. मनीष श्रीगिरीवार, नोडल अधिकारी – अंगदान व प्रत्यारोपण सेवा तसेच MJPJAY आणि PMJAY योजनांचे नोडल अधिकारी, यांनी अंगदान जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अधिकाधिक लोकांनी अंगदानासाठी पुढे यावे यासाठी सातत्याने जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की एम्स नागपूरमध्ये झालेले सर्व यशस्वी किडनी प्रत्यारोपण MJPJAY आणि PMJAY योजनांअंतर्गत करण्यात आले असून त्यामुळे उपचार रुग्णांसाठी सुलभ व परवडणारे झाले आहेत.

कार्यक्रमादरम्यान डॉ. अमोल भावणे, प्रभारी – किडनी ट्रान्सप्लांट युनिट, यांनी उपस्थितांना पोस्ट-ट्रान्सप्लांट काळजी, नियमित औषधोपचार, वेळोवेळी फॉलो-अप आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. चंद्रकांत मुंजेवार, सहयोगी प्राध्यापक व प्रभारी – युरोलॉजी विभाग, यांनी आभार प्रदर्शन करत सर्व सहभागी, दाते, डॉक्टर आणि कर्मचारी यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट दाते त्यांच्या कुटुंबियांसह, संभाव्य किडनी प्रत्यारोपण रुग्ण तसेच डायलिसिसवर उपचार घेत असलेले अनेक रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे हा कार्यक्रम संवाद, जनजागृती आणि अंगदानासाठी प्रेरणा देणारे व्यासपीठ ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रान्सप्लांट समन्वयक गजानन गिते, पूजा सुलानिया आणि दिव्या गाइगोले यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रमाचे संचालन सुश्री गीता सुप्रिया यांनी केले. हा कार्यक्रम महिला दात्यांचा सन्मान करण्याबरोबरच अंगदानाच्या जीवनरक्षक महत्त्वाबाबत जनजागृती निर्माण करणारे प्रेरणादायी व्यासपीठ ठरला.