– भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल
मुंबई :- एकीकडे ‘मराठी मराठी’ असा गळा काढायचा आणि दुसरीकडे पत्राचाळ घोटाळे करून मराठी माणसाला रस्त्यावर आणायचे हा धंदा करणा-या संजय राऊत यांनी मराठी माणसाला खड्ड्यात घालण्याचे काम केले. मराठी माणसाची लूट करणाऱ्यांनी मराठीच्या नावाने गळे काढणे त्वरित बंद करावे. एशियाटिक सोसायटी आणि मराठी अभ्यास केंद्र म्हणा सगळीकडे महाविकास आघाडीचा शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवण्याचा कुटील डाव असल्याचा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. मराठी-अमराठी वाद निर्माण करून नक्षलवादी प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे काम विरोधक करत असले तरी त्यांचा कुटील डाव कधीही यशस्वी होणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी बन म्हणाले की, मराठी भाषा संवर्धन आणि संस्कृती रक्षणाचे काम भारतीय जनता पार्टी प्रकर्षाने करत आहे. 25 वर्षे मुंबई आणि मराठी माणसाची लूट करणा-यांना मतदारांनी घरी बसवले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मराठी माणूस आहे.
महाराष्ट्रात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाकडे भाजपा महायुती सरकार प्राधान्याने लक्ष देत आहे. येणा-या अडचणींवर मात करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. मात्र राऊत आणि विरोधक देशात आग लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा आगलावेपणा यशस्वी होणार नाही असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाची झळ कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. ठिकठिकाणी गॅस वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जातो आहे. गॅस पुरवठा विस्कळीत होण्याची भीती असतानाच, 92 हजार 700 टन एलपीजी घेऊन दोन भारतीय जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून सुखरूपपणे गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरावर पोहोचली आहेत. मात्र या संकटकाळातही राऊत घाणेरडे राजकारण करत गुजरात महाराष्ट्र असा वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. खोट्यानाट्या बातम्या पसरवून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा हल्लाबोल बन यांनी केला.
बन म्हणाले की, औरंगजेब आणि अफजलखानाचा उदो उदो करणारी कवने गायची सवय जडलेल्या राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भजन करण्याचा खोचक उपदेश देऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात देशाची होणारी प्रगती राऊतांना बघवत नाही. देशातील वेगवेगळी देवस्थानेही या संकट काळात सरकार सोबत उभी आहेत. संजय राऊत मात्र खोटेनाटे सांगून जनतेत घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.








