spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत समतेचा महाकुंभ; २० मार्चला दसरा मैदानावर वैचारिक व सांस्कृतिक महोत्सव

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आणि महाड सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्षदिनाचे औचित्य साधून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘घर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत एका भव्य ‘समतेचा वैचारिक व सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक दसरा मैदान, भंडारा येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवामध्ये संविधान जनजागृतीसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरात आपल्या प्रबोधनासाठी प्रसिद्ध असलेले पंकज पाल महाराज आणि भंडाऱ्याचा लोकप्रिय ‘द गोल्डी म्यूजिकल ग्रुप’ आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. संवैधानिक मूल्यांवर आधारित प्रेरणादायी गीते तसेच ‘बुद्ध-भीम’ गीतांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन केले जाणार आहे.

केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे तर वैचारिक मंथनासाठी देखील हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे गाढे अभ्यासक व वक्ते ज्ञानेश्वर रक्षक हे प्रामुख्याने उपस्थित राहून संविधानाचे महत्त्व आणि समतेचा विचार मांडणार आहेत.

समाजात समता, बंधुता आणि न्याय या संवैधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा महोत्सव मैलाचा दगड ठरेल. या ऐतिहासिक सोहळ्याला भंडारा जिल्ह्यातील संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारा बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने अजय तांबे, प्रतिक मेश्राम, प्रशांत मेश्राम, रणजीत मेश्राम, अमित नंदेस्वर व इतर मान्यवरांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

Popular Articles