– वाहतूक नियंत्रण शाखेची मोठी कारवाई; मध्यप्रदेशातील दोन चालकांना घेतले ताब्यात
भंडारा :- भंडारा शहरात विनापरवाना रेतीची तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आज दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या कारवाईत ५० लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन टिप्परवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार कामटे, पोलीस नाईक अमित वंजारी आणि पोलीस शिपाई फेंडर हे शहरात पेट्रोलिंग ड्युटीवर असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन रेती भरलेले टिप्पर विनापरवाना वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह साई मंदिर बायपास रोड येथे नाकाबंदी केली.
टाकळीकडून येणाऱ्या दोन संशयास्पद टिप्परना पोलिसांनी थांबवून त्यांची झडती घेतली. यावेळी टिप्पर क्रमांक MH 49 BZ 5602 चा चालक रुपेश राजन ठाकरे (वय ३४, रा. सारसडोल, जि. शिवनी, मध्य प्रदेश) आणि टिप्पर क्रमांक MH 49 BZ 8702 चा चालक संजय जगन्नाथ डोंगरे (वय ३३, रा. पाथर्डी, जि. शिवनी, मध्य प्रदेश) यांच्याकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही वाहनांची पाहणी केली असता, प्रत्येक टिप्परमध्ये ७ ब्रास याप्रमाणे एकूण १४ ब्रास रेती भरलेली आढळून आली. पोलिसांनी ४२ हजार रुपये किमतीची ७ ब्रास रेती आणि २५ लाख रुपये किमतीचा टिप्पर, असा एका वाहनाचा २५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशाप्रकारे दोन्ही वाहनांसह एकूण ५० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्तीचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे.
ही कारवाई साई मंदिर परिसरातील बायपास रोडवर करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अवैध गौण खनिज तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असेच कडक पाऊल उचलले जाईल, असे संकेत पोलीस विभागातर्फे देण्यात आले आहेत.








