पांढरकवडा :- पंचायत समिती येथे ग्रामसेवक व कोलाम समाजाच्या ग्रामस्थ मध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालना समोर मोठ्या प्रमाणात राडा झाला. मांगुर्डा येथील कोलाम बांधव हे या देशाचे नागरिक आहेत, ते सुद्धा माणसं आहेत. त्यांना माणसासारखी वागणूक द्यायला शिका. जर कोलाम समाजाचा ‘गांजर’ म्हणून अपमान करत असाल, तर याद राखा, गाठ माझ्याशी आणि शामादादा कोलाम ब्रिगेडशी आहे,” अशा कडक शब्दांत प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी ग्रामसेवक रवी बोरकर याला ठणकावून सांगितले आहे. मांगुर्डा येथील कोलाम बांधव आपल्या हक्काच्या घरकुल योजनेतील जागेच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ग्रामसेवकाकडे गेले होते. मात्र, मदत करण्याऐवजी ग्रामसेवक बोरकर याने “कोलामाले काय गांजर समजते काय?” असे म्हणत समाजाचा जाहीर अपमान केला. या प्रकारामुळे संपूर्ण कोलाम समाजात संतापाची लाट उसळली आहे.
इंदिरा बोंदरे यांचा एल्गार:
या घटनेचा निषेध करताना इंदिरा बोंदरे म्हणाल्या की, “शासकीय खुर्चीवर बसून गरिबांना तुच्छ लेखणाऱ्या या ग्रामसेवकाचा माज आता उतरवण्याची वेळ आली आहे. कोलाम समाज हा स्वाभिमानी समाज आहे. त्यांना गांजर समजण्याची चूक करू नका. पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांनी या मुजोर कर्मचाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती येथे करण्यात आली व प्रशासनाने याला पाठीशी घातले, तर त्याचे परिणाम गंभीर होतील.”
प्रशासनाला इशारा देण्यात आले
या अपमानप्रकरणी ग्रामसेवक रवी बोरकर याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी शामादादा कोलाम ब्रिगेडने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास कोलाम समाज रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल, असा इशाराही देण्यात आला. मात्र प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात येताच पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यानी ग्रामसेवक व मांगुर्डा येथील कोलाम समाज बांधवांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आले.








