spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्वेषपूर्ण भाषणांबद्दल संजय राऊतांनाच चार वेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईल

– भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची बोचरी टीका

कर्नाटकच्या हेट स्पीच विधेयकाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये असा कायदा आणला तर सगळ्यात जास्त द्वेषपूर्ण भाषणे करणारे संजय राऊतच उघडे पडतील आणि राऊतांना या प्रकरणांमध्ये एकदा नाही तर चार वेळेला जन्मठेप होईल अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली.

रोज उठून अशुभ बोलणारे आणि प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणा-या संजय राऊतांना मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कोण कोण गेले याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे बन यांनी खडसावले. शुभ कार्य,परंपरा आणि संस्कृतीशी काहीही देणेघेणे नाही. सत्तेसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार, हिंदू परंपरा, संस्कृती यांच्याशी फारकत घेऊन औरंगजेब क्लब चालवणा-यांना शुभकार्य काय असते हेच कळणार नाही असाही टोला त्यांनी लगावला.

त्यावेळची शिवसेना आणि भाजपा सोबतचा संघर्ष हा 2014 पासून भाजपाने सुरु केला आहे अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या राऊतांना खडे बोल सुनावत बन म्हणाले की 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ठाकरे सेना भागीदार होती याचे विस्मरण राऊतांना झाल्याचे दिसते. 2019 ला मुख्यमंत्रीपदाची हाव सुटल्याने उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस , भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेससोबत सोयरीक जमवली. भाजपासोबत संघर्ष करण्याची उबाठा गट आणि राऊतांची लायकीच नाही हे मतदारांनीच विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दाखवून देत उबाठा गटाला घरी बसवले असा घणाघात त्यांनी केला. वैचारिक सुंथा झालेल्या राऊतांनी भाजपावर टीका करू नये असे त्यांनी खडसावले .

उबाठा गट फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार असा राऊतांचा दावा तद्दन हास्यास्पद असल्याचे म्हणत बन यांनी उबाठा गटाचा कोंबडा झाल्याची खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वशून्य नेतृत्वामुळे 40 आमदार सोडून जात असल्याचा साधा सुगावा लागला नाही त्यांनी ऑपरेशन टायगर बद्दल चकार शब्द न बोलणेच इष्ट असेही ते म्हणाले. उद्धव यांच्या अहंकारापोटी वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकले झाली. घरबशा नेतृत्वामुळे उरलेसुरले कधी उडून जातील हेही कळणार नाही असा टोमणा त्यांनी मारला.

अमेरिकेतील लोकशाही मजबूत असल्याचा दावा संजय राऊत करतात, पण भारतासारखी सक्षम आणि जनाधार असलेली लोकशाही जगात कुठेच नाही, हे वास्तव आहे. बांगलादेशात अराजकता पसरली, पाकिस्तानात यादवी माजली तेव्हा भारतातही तसेच होईल अशी राऊतांनी स्वप्ने पाहिली होती. आता अमेरिकेत गोंधळ उडाला, तेव्हाही राऊत पुन्हा त्याच भ्रमात आहेत, भारतातही तशीच स्थिती निर्माण होईल असे राऊतांना वाटते. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. राहुल गांधी आणि राऊतांनी कितीही नेपाळ, अमेरिकेसारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा हा कट जनता उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी अधोरेखित केले.

Popular Articles