spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग सर्वेक्षण पासून वंचित व्यक्तींकरिता ऑनलाईन नोंदणीची सुविधा

नागपूर, ता. २३  : नागपूर महानगरपालिकेद्वारे दिव्यांगांचा एकत्रित डाटा संकलीत करण्यासाठी दिव्यांग सर्वेक्षण करण्यात येत आहे. मनपाच्या आशा सेविकांद्वारे घरोघरी भेट देऊन दिव्यांग सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्वेक्षण कार्य अंतिम टप्प्यात असून आशा सेविकांना माहिती देण्यापासून कुणीही दिव्यांग कुठल्याही कारणामुळे वंचित राहिले असल्यास त्यांच्यासाठी मनपाने गूगल फॉर्मद्वारे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २७ जुलै २०२५ पर्यंत ही सुविधा सुरु राहणार असून यात दिव्यांग बांधवांना स्वतःच माहिती भरून आपले सर्वेक्षण करू शकतात.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग सर्वेक्षण अत्यंत आवश्यक आहे. या सर्वेक्षणापासून कुणीही वंचित राहू नये हा मनपाचा उद्देश आहे. आशा सेविकांच्या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना ऑनलाईन सर्वेक्षण करण्याची गरज नाही. केवळ जे दिव्यांग आशांद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत, ज्यांची नोंदणी आशांकडे झालेली नाही, अशाच दिव्यांग व्यक्तींकरिता ऑनलाईन सर्वेक्षणाची सुविधा असणार आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींनी मनपाच्या संकेतस्थळावर ‘पब्लिक नोटीस – आरोग्य विभाग’ यामध्ये ‘दिव्यांग सर्वेक्षण’ या मथळ्याखालील https://forms.gle/rbJzgVtKczg3e4Sk6 या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म मध्ये आवश्यक दहा प्रश्नांची माहिती भरून आपले सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात आणि समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात मनपाच्या आशा सेविकांमार्फत २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाची ओळख करून घेण्यासाठी दहाही झोनमध्ये हे सर्वेक्षण सुरू आहे. दिव्यांगांच्या सर्वेक्षणामुळे पुढील काळात दिव्यांगांच्या उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होणार आहे. केंद्र, राज्य सरकार व मनपाच्या  सर्व कल्याणकारी योजनांचा दिव्यांगांना लाभ पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल आहे.

Popular Articles